प्रसाधनगृह, स्नानगृहात सीसीटीव्ही बसवणार का? कनिष्ठ न्यायालयाचा ईडीला संतप्त सवाल

सध्या रुग्णालयात कर्करोगाचे उपचार सुरू असलेल्या गोयल यांनी वैयक्तिक मदतनीस देण्याची विनंती करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला. या अर्जावर विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी ईडीने अर्जाला जोरदार विरोध केला.
प्रसाधनगृह, स्नानगृहात सीसीटीव्ही बसवणार का? कनिष्ठ न्यायालयाचा ईडीला संतप्त सवाल

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगग्रस्त उद्योगपती व आरोपी नरेश गोयल यांना रुग्णालयात वैयक्तिक मदतनीस ठेवण्यास विरोध करणाऱ्या ईडीची सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने चांगलीच कानउघाडणी केली. न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी ईडीच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी करत आरोपी स्ट्रेचरवर असताना ईडी कर्मचाऱ्यांच्या व पोलिसांच्या देखरेखीखाली आहे हे पुरेसे नाही का? प्रसाधनगृहात, स्नानगृहामध्ये सीसीटीव्ही बसविण्याची इच्छा आहे का? असे प्रश्न उपस्थित करत गोयल यांनी वैयक्तिक मदतनीस देण्यास परवानगी दिली.

बँकेच्या सुमारे ५३८ कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने गोयल यांना अटक केली. गोयल यांच्या जेट एअरवेजला ७२८ कोटींचे कर्ज दिले होते. त्या रकमेपैकी ५३८ कोटी ६२ लाख रुपयांचे कर्ज जेट एअरवेजने थकविले. गोयल यांनी मोठ्या प्रमाणावर हेराफेरी करून हा पैसा विदेशात पाठवल्याचा ईडीचा आरोप आहे. कॅनरा बँकेने तक्रार दिल्यानुसार, सीबीआयने गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आणि गोयल यांना १ सप्टेंबर रोजी अटक केली.

सध्या रुग्णालयात कर्करोगाचे उपचार सुरू असलेल्या गोयल यांनी वैयक्तिक मदतनीस देण्याची विनंती करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला. या अर्जावर विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी ईडीने अर्जाला जोरदार विरोध केला. ईडी कर्मचाऱ्यांच्या व पोलिसांच्या देखरेखीखाली असल्याने वैयक्तिक मदतनीसाची गरज नसल्याचे सांगताच न्यायालयाने संताप व्यक्त केला.

आरोपी अर्जदार स्ट्रेचरवर असताना व ईडी कर्मचाऱ्यांच्या व पोलिसांच्या देखरेखीखाली आहे, हे पुरेसे नाही का? त्यांना मदतनीस देण्यास विरोध करणे योग्य आहे का? मानवतेच्या भूमिकेला विरोध का? प्रसाधनगृहात, स्नानगृहामध्ये सीसीटीव्ही बसवण्याची ईडीची इच्छा आहे का? त्याच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू असताना विरोध करण्याची गरज आहे का? अशा प्रश्नांचा भडीमार करत ईडीचे कान उपटले.

ईडीची ही भूमिका राज्यघटनेने व्यक्तीला दिलेल्या हक्काच्या विरोधात आहे. त्यांच्या कुटुंबातील पुरुष व्यक्ती त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये नाही. त्यांची पत्नीही कर्करोगाने आजारी असून ती अखेरच्या टप्प्यात आहे. त्यांच्यावर प्रोटेस्ट सर्जरी झाली आहे. त्यांच्या रोजच्या नैसर्गिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरुष मदतनीसाची गरज असल्याचे स्पष्ट करत नरेश गोयल यांना वैयक्तिक मदतनीस देण्याचे आदेश दिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in