
गुढीपाडव्याच्या सणाला काढण्यात येणाऱ्या शोभायात्रा आणि रामनवमी उत्सवाला परवानगी देण्यासंबंधी राज्य शासन सकारात्मक असल्याची माहिती गृहविभागाच्या सूत्रांनी दिली. राज्यातील कोरानास्थिती आटोक्यात आल्यानंतर विविध उत्सव, परंपराही पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता गुढीपाडवा आणि रामनवमी साजरी होणार असून, रामनवमीच्या निमित्ताने राज्यात मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मिरवणुका काढल्या जातात. गुढीपाडव्याला मराठी नववर्षानिमित्तानेही राज्यात मोठ्या प्रमाणात शोभायात्रांचे आयोजन करण्यात येते.
या मिरवणुकांना व शोभायात्रांना सरकारने परवानगी देण्याबाबत भाजप नेते आशिष शेलार सातत्याने मागणी करत आहेत. दरम्यान, “हिंदू सणांना परवानगी देण्याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?” असा सवाल भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी पुन्हा केला आहे. गुढीपाडवा तोंडावर असताना त्यानिमित्ताने निघणाऱ्या शोभायात्रा आणि रामनवमीच्या मिरवणुका यांना परवानगी देण्यासंदर्भात राज्य सरकारने अजून निर्णय घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर शेलार यांनी सरकारवर टीका केली. “मुंबई पोलिसांनी मुंबईत १० मार्च ते ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले असून, त्यासाठी आतंकवादी, देशविरोधी शक्ती या ड्रोन, रिमोट कंट्रोलचा वापर करून हल्ला करतील, अशी माहिती पोलिसांकडे आल्याचे ते सांगत आहेत. अशी माहिती आली असेल तर त्याबाबत सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी जरूर घ्यावी,” असे शेलार म्हणाले.