आरेमधील दोन हजारांहून अधिक झाडे कापावी लागणार?

कांजुरमार्ग येथील कारशेड पुन्हा आरेमध्ये हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने घेतला आहे.
 आरेमधील दोन हजारांहून अधिक झाडे कापावी लागणार?

मेट्रो ३साठी (कुलाबा-वांद्रे-कुलाबा) आरे परिसरातच कारशेड उभारण्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आता आरेमधील कारशेडसाठी एकाही झाडाची कत्तल करावी लागणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. मात्र हा दावा साफ खोटा असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. आरेमधील कारशेडसाठी २,७०० झाडे कापण्यात येणार असल्याचे ‘मेट्रो ३’च्या मूळ प्रस्तावात नमूद आहे. आतापर्यंत २७००पैकी अंदाजे २०० ते २५० झाडेच कापण्यात आली आहेत. त्यामुळे आरेमध्ये कारशेड उभारण्यासाठी अद्याप दोन हजारांहून अधिक झाडे कापावी लागणार असून यामुळे पर्यावरणप्रेमींचा येथे कारशेड उभारण्यास विरोध आहे.

कांजुरमार्ग येथील कारशेड पुन्हा आरेमध्ये हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने घेतला आहे. या निर्णयाला पर्यावरणप्रेमींनी कडाडून विरोध केला आहे. तर कारशेड आरेमध्येच उभारण्यावर सरकार ठाम आहे. कारशेडच्या आड येत असलेली आरे परिसरातील झाडे कापून झाली आहेत. आता कारशेडसाठी एकही झाड कापण्याची गरज नाही. त्यामुळे पर्यावरणप्रेमींचा विरोध हा मुद्दाच राहत नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी उपमुख्यमंत्र्यांचा हा दावा साफ खोटा असल्याचे सांगत त्यांच्या या वक्तव्याचे खंडन केले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) मूळ प्रस्तावात आरेतील २७०० झाडे कापण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे परवानगी मागितली होती. २०१९ मध्ये रात्रीच्या वेळी आरेतील झाडे कापण्यात आली. त्या वेळी आंदोलकांनी आरे वसाहतीत धाव घेऊन वृक्षतोड थांबवली. या वेळी एमएमआरसीने २०० ते २५० झाडांची कत्तल केली होती. त्यातही या दोन ते अडीच वर्षांत कापण्यात आलेल्या झाडांच्या ठिकाणी नव्याने झाडे आली आहेत. त्यामुळे आरेत एकही झाड कापावे लागणार नाही, असा दावा करून फडणवीस दिशाभूल करत असल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in