
राज्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर सरकार ‘अतिदक्षता’ बाळगत आहे. राज्यातील शाळा ९, १३ व १५ जूनपासून सुरू होणार आहेत. पूर्ण खबरदारी घेऊनच शाळा सुरू करण्यात येतील, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी केली.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघा आठवडा राहिला असतानाच कोरोनाचे नवीन संकट उभे राहिले आहे. त्यामुळे सरकारने शाळांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे ठरवले आहे. ती लवकरच जाहीर करण्यात येतील. राज्यातील काही ठिकाणी शाळा ९, १३ व १५ जूनला सुरू होणार आहेत. कोविडची रुग्णसंख्या वाढू लागली, तरीही पूर्ण खबरदारी घेऊन शाळा सुरू केल्या जातील. शाळेत मास्कसक्ती करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे त्या म्हणाल्या.
राज्यात कोविडरुग्णांची संख्या १४९४ तर सक्रिय रुग्णांची संख्या ६७६७ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारला कोरोनाच्या विरोधात कठोर भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यात चाचण्या, रुग्णांचा शोध, उपचार व लसीकरण आदी उपाययोजनांचा समावेश आहे. आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी नागरी व जिल्हा प्रशासनाला लसीकरणाचे आदेश दिले आहेत.