धनुष्यबाणापुढे कमळ फुलणार ?

राज्यात सत्ता समीकरण बदलल्यानंतर शिंदे गट अन् भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढणे सहाजिकच आहे.
धनुष्यबाणापुढे कमळ फुलणार ?

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी नंतर राज्यातील राजकीय चित्रच बदलले अन् भाजप सत्तेत पुन्हा आली. राज्यात सत्ता समीकरण बदलल्यानंतर शिंदे गट अन् भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढणे सहाजिकच आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची सत्ता एक हाती काबीज करण्यासाठी भाजपची रणनीती यशस्वी ठरते की शिंदेंचे बंड, हे पुढील काही महिन्यांत स्पष्ट होईलचं. तर गेल्या चार दशकांपासून शिवसेनेवर मुंबईकरांनी दाखवलेला विश्वास पुढेही कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यात बंड, साम-दाम-दंड-भेद याचा वापर करत राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला मुंबई महापालिकेत सत्ता काबीज करणे तितकेसे सोपे नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेत उलथापालथ होईलच हे पुढील चार महिन्यांत स्पष्ट होईल.

राज्यात सत्ता स्थापनेचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर भाजपचे लक्ष मुंबई महापालिकेवर कमळ फुलवणे आहे. १२० जागा भाजपच्या असा दावा आधीपासून भाजप नेत्यांकडून करण्यात येत होता. आता तर राज्यात सत्ता आल्याने मुंबई महापालिकेतून शिवसेनेलाच पाय उतार करण्याची संधीच चालून आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव यांनी ही पाठिंबा दिला आणि शिंदे यांच्या विश्वासाची उत्तीर्ण झाले. आमदारांनी शिंदे यांना समर्थन दिल्यानंतर मुंबई महापालिकेतील २० ते २५ नगरसेवक शिंदे यांच्या समर्थनात पुढे येणार यात दुमत नाही. फक्त बंडाळी करणारे नगरसेवक फक्त मुंबई महापालिका निवडणुका जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र राज्यात सत्ता स्थापन झाल्याने शिंदे समर्थकांचा आत्मविश्वास वाढला असून सत्तेची लालसा, इडी, आयकर विभागाच्या कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शिवसेनेविरोधात २० ते २५ नगरसेवक बंड पुकारणार याचे संकेत स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी भाजप नेते आतापासून कामाला लागणार यात दुमत नाही. तर चार दशकांपासून असलेली सत्ता पुढे ही आपल्याच हाती रहावी, यासाठी शिवसेनेलाही खेळीत बदल करावा लागणार आहे. नगरसेवकांनी बंडाचे हत्यार उपसू नये यासाठी प्रत्येक नगरसेवक, कार्यकर्ता शिवसेनेचा प्रमुख आहे, असा विश्वास निर्माण करणे शिवसेनेची गरज झाली आहे. बंडखोरांमुळे तळागाळातील शिवसैनिक जनतेसमोर येऊ शकला नाही, अशा शिवसैनिकांना मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकेतील निवडणुका, नगर पालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देऊन आत्मविश्वास वाढवणे शिवसेनेसाठी एक उभारी घेण्यासारखे आहे. मात्र राजकारणात काहीही शक्य या म्हणीप्रमाणे मुंबई महापालिका निवडणुकीत काय होतं हे पहाणे गरजेचे आहे. मतभेद झाले की राजकीय समीकरण बदलण्यास वेळ लागत नाही, हे राज्यात दिसून आले. शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्ता स्थापन करणे भाजपचे स्वप्न पूर्ण झाले आणि मुंबई महापालिकेकडे लक्ष वळवले आहे.

शिंदे यांच्या बंडानंतर २० ते २५ नगरसेवक शिंदे गटात येतील, अशी चर्चा रंगू लागली आहे. काही नगरसेवक तर नक्कीच शिंदे यांच्या प्रेमात असतील. मात्र आजही कट्टर शिवसैनिक शिवसेनेत असून सहजासहजी पराभव स्विकारणारे नाहीत. त्यामुळे यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजप दोन्ही पक्षांसाठी शिंदे यांचे बंड किती फायदेशीर ठरत हे मुंबई महापालिका निवडणुकीत स्पष्ट होईलचं.

मुंबई पालिकेत सत्ता हा

भाजपचा मुख्य उद्देश

बेधडक नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत ओळख असली तरी मुंबई महापालिकेत शिंदे यांचा तसा दबदबा नाही. मात्र शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्ता स्थापन करणे भाजपचे स्वप्न पूर्ण झाले. शिवसेनेची आर्थिक कोंडी करण्यासाठी मुंबई महापालिकेत सत्ता काबीज करणे हा भाजपचा मुख्य उद्देश आहे. शिंदे यांच्या बंडानंतर मुंबई महापालिकेत तब्बल चार दशकानंतर सत्तेचा उपभोग घेता येईल, अशी रणनीती भाजपकडून आखली जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत सत्ता टिकणे ही शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई असली तरी भाजपसाठी प्रतिष्ठेची निवडणूक ठरणार आहे. शिंदे यांच्या मुंबई महापालिकेतील कमळ फुलवण्याची जबाबदारी देणे म्हणजे मुंबईतील भाजप नेत्यांवर अविश्वास दाखवणे. त्यामुळे मुंबई महापालिकेत सत्ता काबीज करताना भाजप नेत्यांनाही आपल्याच नेत्यांच्या बंडाला सामोरे जावे लागले, असे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in