
जूनमध्ये वाऱ्याचा वेग कमी असल्याने, तसेच किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा क्षीण झाल्यामुळे पावसाचा जोर कमी आहे. जुलैमध्येही राज्यभरात अशीच स्थिती राहण्याची शक्यता असल्याने पाऊस मोठा खंड घेऊन पडेल. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात सुमारे ५४ टक्के पावसाची कमतरता आढळली आहे.
यंदा पावसाची सुरुवात खूप संथगतीने झाली. काही काळ दडी मारलेल्या पावसाचा जोर काहीसा वाढला असला, तरी ही परिस्थिती काही काळच राहणार आहे. त्यानंतर जुलैमध्ये पाऊस मोठमोठे खंड घेऊन पडेल, असा अंदाज आहे. राज्यातील तीन ते चार जिल्हे सोडले, तर उर्वरित जिल्ह्यांत सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे. फक्त कोकणात तो सरासरीच्या आसपास पडला. केरळ, कर्नाटकात पावसाची कामगिरी खराब आहे. या दोन्ही राज्यांत पावसाची तूट दिसून येत आहे. अशीच परिस्थिती जुलैमध्येही असेल.
वाऱ्याचा वेग मंदावल्याने जूनमध्ये पावसात खंड पडला. जूनच्या अखेरच्या आठवड्यात काहीसा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानंतर १५ जुलैपर्यंत पाऊस मोठा खंड घेऊन पडण्याची शक्यता आहे, तर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही पावसाचे प्रमाण चांगले राहील, अशी माहिती ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली.