मोठमोठ्या गणेशमूर्ती संरक्षित करण्याचा प्रयत्न करणार; रमाकांत बिरादार यांचे प्रतिपादन

पालिकेने ७३ ठिकाणी नैसर्गिक तसेच १६२ कृत्रिम विसर्जन केंद्रे उभारली आहेत
मोठमोठ्या गणेशमूर्ती संरक्षित करण्याचा प्रयत्न करणार; रमाकांत बिरादार यांचे प्रतिपादन

दोन वर्षांच्या कोरोनाच्या संकटानंतर मुंबईत सर्वच ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जात आहे. गणेशोत्सवाची तयारी, पालिकेकडून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी केलेल्या उपाययोजना तसेच त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि १०० टक्के इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा होऊ शकतो का, याविषयी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्याशी केलेली ही बातचीत-

“यंदा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होत असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालिका आयुक्त आणि अतिरिक्त पालिका आयुक्त यांनी सर्वतोपरी सुविधा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेने ७३ ठिकाणी नैसर्गिक तसेच १६२ कृत्रिम विसर्जन केंद्रे उभारली आहेत. त्यात विसर्जनस्थळी निर्माल्यपेट्या, अॅम्ब्युलन्स, जीवरक्षक, मोटारबोट्स, देखरेखीसाठी मनोरे आणि शौचालये उभारण्यात आली आहेत. वाहनांचा त्रास होऊ नये, यासाठी चौपाट्यांवर स्टील प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत. सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंट्रोल रूम उभारण्यात आली असून एकूण १० हजार जणांची फौज विसर्जनासाठी तैनात करण्यात आली आहे,” असे बिरादार यांनी सांगितले.

“समुद्रात विसर्जन केल्यानंतर गणेशमूर्तींचे पूर्णपणे विघटन होत नसल्याने आम्ही कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याच्या सूचना गणेशभक्तांना दिल्या आहेत. घरगुती गणपती इकोफ्रेंडली तसेच दोन फुटांपर्यंतच असावा, अशी विनंती आम्ही केली असून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती न वापरण्याचे आवाहन केले आहे. औद्योगिक वसाहतीत ७५ डेसिबलच्या पुढे तसेच व्यावसायिक वसाहतीत ६५ आणि निवासी इमारतीत ५५ डेसिबलच्या पुढे आवाजाची मर्यादा नसावी, अशा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचना आहेत. गणेशोत्सवात ८०० मेट्रिक टन निर्माल्य जमा होत असून त्यातील फुलांचा वापर आम्ही रंग बनवण्यासाठी करणार आहोत.

लोकांमध्ये इकोफ्रेंडली उत्सवाबाबत जागरूकता वाढत असून शाडूमाती, कागद तसेच लाकूड आणि इकोफ्रेंडली साहित्याचा वापर करून गणेशमूर्ती साकारल्या जात आहेत. विविध समित्यांमार्फत आम्ही हा उत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. या वर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच इकोफ्रेंडली रंग वापरण्याचे आवाहन आम्ही गणेशमूर्तिकारांना केले आहे. गणेशोत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे शक्य आहे. त्यासाठी पुणे शहराचा फॉर्म्युला वापरण्याची गरज आहे. पुण्यात मोठाल्या गणेशमूर्तींचे विसर्जन न करता शाडूमातीच्या छोट्या मूर्ती विसर्जित केल्या जातात. मोठमोठाल्या गणेशमूर्ती पाण्यात विसर्जित न करता त्या संरक्षित करण्यात याव्यात, अशा टप्प्यावर आम्ही येऊन पोहोचलो आहोत,” असेही बिरादार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in