मुंबईकरांच्या हिताचे उपक्रम हाती घेणार! दिपक केसरकर यांचे आश्वासन

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी बैठक घेवून महानगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा देखील घेतला
मुंबईकरांच्या हिताचे उपक्रम हाती घेणार! दिपक केसरकर यांचे आश्वासन

मुंबई महापालिकेत अनुभवी व तज्ज्ञ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. मुंबईत कौशल्याची कमतरता नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या हिताचे उपक्रम हाती घेण्यात येतील, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी बैठक घेवून महानगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा देखील घेतला.

महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त व इतर खातेप्रमुख याप्रसंगी उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांना नागरी सेवा-सुविधा पुरवतेच. महानगरपालिका प्रशासनात अनुभवी व तज्ज्ञ मनुष्यबळ आहे, त्याचप्रमाणे मुंबईतही कौशल्याची कमतरता नाही. या सर्वांची सांगड घालून मुंबई महानगराच्या विकासासाठी जे-जे नावीण्यपूर्ण, आधुनिक व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य नागरिकांच्या कल्याणाशी जोडलेले उपक्रम राबवता येतील, ते हाती घेण्याचा मानस आहे. अरुंद व दाटीवाटीच्या वस्तींमध्ये राहणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, इतर वंचित घटक या सर्वांना मुंबई महानगरामध्ये योग्य स्थान मिळावे म्हणून शिक्षण, रोजगार निर्मिती, आरोग्य या क्षेत्रांसह इतरही आवश्यक त्या सर्व क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण वाढ होण्यासाठी महानगरपालिका व राज्य शासन यांच्यामध्ये दुवा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करीन, असेही पालकमंत्री केसरकर यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in