नागपूरला ७ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

. या पार्श्वभूमीवर येत्या ८ डिसेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री व विद्यमान आमदार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात येणार आहे
नागपूरला ७ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. सध्या आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू असल्याने अधिवेशन ११ डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाने आता अधिवेशन ७ डिसेंबरपासूनच सुरू होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

मुंबई येथे विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे आदी उपस्थित होते. हिवाळी अधिवेशन ७ ते २० डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे. अधिवेशनाचे एकूण दिवस १४ (सुट्ट्यासह) प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, सुट्या(शनिवार व रविवार) ४ दिवस असे असणार आहे.

विधान परिषदेचे शतकोत्तर वर्ष

महाराष्ट्र विधान परिषदेचे शतकोत्तर वर्ष साजरे केले जात आहे. सन १८६१ च्या इंडियन कौन्सिल ॲक्टनुसार स्थापित कौन्सिल ऑफ द गव्हर्नर ऑफ बॉम्बेची पहिली बैठक २२ जानेवारी, १८६२ रोजी मुंबई येथील टाऊन हॉलच्या दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. पुढे माँटेग्यू-चेम्सफर्ड शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियम १९१९ अन्वये बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलची प्रारंभिक बैठक १९ फेब्रुवारी, १९२१ रोजी टाऊन हॉल मुंबई येथे झाली. नारायण गणेश चंदावरकर यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी झालेली नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना होती. सन १८६२ ते सन १९२० पर्यंत गव्हर्नर ऑफ बॉम्बे यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिलचे कामकाज चालत होते. सन १९२१ मध्ये नारायण चंदावरकर यांच्या रुपाने पहिल्यांदा भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली. नारायण चंदावरकर हे परिषदेचे पहिले नामनिर्देशित सभापती होते. रावसाहेब एच.डी. देसाई हे निवडणुकीद्वारे उपसभापतीपदी निवडून आले. सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधान परिषद शतकपूर्तीचा कालखंड मानता येईल. कोविड-१९ महामारीमुळे यावेळी जाहीर कार्यक्रम घेणे शक्य झाले नाही. या पार्श्वभूमीवर येत्या ८ डिसेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री व विद्यमान आमदार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यादरम्यान विधान परिषद सभागृहाचे दीर्घकाळ कामकाज पाहणाऱ्या जेष्ठ पत्रकारांचा सत्कार यावेळी करण्यात येणार असल्याचे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच राष्ट्रकुल संसदीय मंडळ चर्चासत्र ११ डिसेंबर पासून सुरू होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in