
मुंबईतील मस्जिद बंदर येथील मांडवी कोळीवाडा येथील तोफा गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित अवस्थेत पडून आहेत. या तोफांच्या संवर्धनाची मागणी स्थानिकांसह इतिहास वस्तू- वास्तू संकलकांकडून, अभ्यासकांकडून करण्यात येत असून, यासंदर्भातील मागणी पत्र महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाच्या संचालकांना पाठवण्यात आले आहे.
मुंबईतील मस्जिद बंदर येथील मांडवी कोळीवाडा, सिमेंट चाळ या ठिकाणी गेली कित्येक वर्षे दोन पुरातनकालीन दोन तोफा दुर्लक्षित अवस्थेत असून या तोफा जुन्या मुंबईच्या इतिहासाच्या महत्त्वाच्या साक्षीदार आहेत. या तोफांचे मांडवी कोळीवाडा येथेच दर्शनी भागात जतन-संवर्धन करण्याची मागणी राज्य पुरातत्त्व विभागाकडे पत्राद्वारे मुंबईतील पुरातन वास्तू - वस्तू संवर्धक चंदन विचारे यांनी केली आहे. या तोफांच्या संवर्धनासाठी बृहन्मुंबई हेरिटेज समिती, पुरातन वारसा जतन कक्ष आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व खाते यांच्या संयुक्त विद्यमानातून जतन- संवर्धन करण्यात यावे, अशीदेखील मागणी या पत्राद्वारे केली आहे. तसेच परळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग येथील दोन तोफांविषयी तसेच फोर्ट जवळील दोन तोफांच्या जतन- संवर्धनाचा विचार व्हावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
या तोफा मुंबईच्या इतिहासाच्या साक्षीदार असून हा तोफरूपी मौल्यवान ठेवा मांडवी कोळीवाडा येथेच संवर्धन करून ठेवण्यात यावा. जेणेकरून मुंबईकरांस इतिहासाची तोंडओळख पुन्हा नव्याने होईल. येथील स्थानिकांचीही अशीच इच्छा आहे की, सदर ठेव्याचे जतन संवर्धन केले जावे.
-चंदन विचारे, शहराध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ संलग्न गड-किल्ले संवर्धन समिती