
मुंबई : गुंतवणुकीसाठी दिलेल्या बारा लाखांचा अपहार करुन पळून गेलेल्या एका आरोपी महिलेस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. मिनाक्षी सुनिल दुबे असे या महिलेचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहे. गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदर देण्याचे आमिष दाखवून तिने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा आता पोलीस तपास करत आहे. तक्रारदार महिला आणि मिनाक्षी हे दोघीही अंधेरी परिसरात राहतात. एकाच परिसरात राहत असल्याने त्यांची चांगली मैत्री होती. काही महिन्यांपूर्वी मिनाक्षीने तिला तिची जाऊ फंड चालवत असून तिने आतापर्यंत अनेकांना कमी दरात व्याजाने पैसे दिले आहे. त्यासाठी तिला शासनाकडून अधिकृत लायसन्स मिळाले आहे. तिच्यावर विश्वास ठेवून तिने तिच्या जाऊने सुरु केलेल्या फंडात सुमारे चौदा लाखांची गुंतवणुक केली होती. काही महिने तिला व्याजाची रक्कम मिळाली. मात्र कालातंराने तिने व्याजदर देणे बंद केले. याबाबत विचारणा केल्यानंतर ती तिला प्रतिसाद देत नव्हती. गुंतवणुक केलेल्या रक्कमेपैकी सुमारे दिड लाख रुपये मिनाक्षीने परत केले होते. मात्र उर्वरित बारा लाख छत्तीस हजाराचा परस्पर अपहार करुन तिची फसवणुक केली होती. याप्रकरणी या महिलेच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच मिनाक्षी ही पळून गेली होती. अखेर तिला चार महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तिची पोलिसांकडून चौकशी आहे.