मुंबई : मनपा कॉन्ट्रक्टरची एक कोटी ३० लाखांची फसवणुकीप्रकरणी नेहल राजेशभाई ढोलकिया ऊर्फ स्नेहल दोशी या वॉण्टेड महिलेस गोरेगाव पोलिसांनी अटक केली. स्नेहलसह तिच्या सहकाऱ्यांनी ऍण्टीक पीस खरेदी व्यवहारात चांगल्या कमिशनचे आमिष दाखवून या कॉन्ट्रक्टरची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत असून, तिच्या अन्य सहकाऱ्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत. गोरेगाव येथे राहणारे तक्रारदार मनपाचे कॉन्ट्रक्टर आहे.
जानेवारी महिन्यांत त्यांना एका अज्ञात व्यक्तीने त्याच्याकडे एक अॅण्टीक पीस असून, त्याच्या विक्रीसाठी त्यांनी आर्थिक मदत केल्यास त्यांना चांगले कमिशन देण्याचे आश्वासन दिले होते. ते पीस एका खासगी कंपनीला विकण्यात येणार असून, त्यातून त्यांना ५०० कोटी मिळणार आहे. त्यांनी मदत केल्यास त्यांना साठ कोटी देऊ अशी ऑफर या आरोपीसह त्याच्या इतर सहकाऱ्यांनी दिले होते. या आमिषाला बळी पडून त्यांनी त्यांना टप्याटप्याने एक कोटी तीस लाख रुपये दिले होते; मात्र दिलेल्या मुदतीत ऍण्टीक पीसची विक्री करून या आरोपींनी त्यांना कमिशन म्हणून ६० कोटी रुपये दिले नाही. वारंवार विचारणा करूनही ते चौघेही त्यांना टाळत होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी पोलिसांत तक्रार केली होती.