लोकलखाली आलेल्या महिलेचे दोन्ही पाय निकामी, सीबीडी-बेलापूर रेल्वे स्थानकातील घटना

चक्कर येऊन रेल्वे रुळावर पडलेली विवाहित महिला लोकलखाली आल्याने तिचे दोन्ही पाय कापले गेल्याची हृदयद्रावक घटना ८ जुलै रोजी सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकात घडली.
लोकलखाली आलेल्या महिलेचे दोन्ही पाय निकामी, सीबीडी-बेलापूर रेल्वे स्थानकातील घटना
Published on

नवी मुंबई : चक्कर येऊन रेल्वे रुळावर पडलेली विवाहित महिला लोकलखाली आल्याने तिचे दोन्ही पाय कापले गेल्याची हृदयद्रावक घटना ८ जुलै रोजी सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकात घडली. रोहीणी राजेश बोटे असे या विवाहितेचे नाव असून, तिच्यावर बेलापूर येथील एमजीएम हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.

या घटनेतील जखमी विवाहिता रोहिणी बोटे तळोजा येथे राहण्यास असून, ती ८ जुलै रोजी सकाळी कामावर चालली होती. त्यासाठी त्या सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सीबीडी-बेलापूर रेल्वे स्थानकात आल्या होत्या. यावेळी पनवेल येथून ठाणेला जाणारी १०.३० वाजताची लोकल फलाटावर येत असताना रोहिणी बोटे यांना अचानक चक्कर आल्याने त्या रेल्वे रुळावर पडल्या. याचवेळी त्या ठाणे लोकलच्या खाली सापडून गंभीर जखमी झाल्या. त्यामुळे लोकल पाठीमागे घेऊन जखमी रोहिणी यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना सीबीडी येथील एमजीएम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेत रोहिणी बोटे लोकलच्या चाकाखाली आल्याने त्यांचे दोन्ही पाय कापले गेले आहेत. या घटनेतील जखमी महिलेला अचानक चक्कर येऊन ती रेल्वे रुळावर पडल्याने सदरची दुर्दैवी दुर्घटना घडल्याचे पनवेल रेल्वे पोलिसांनी सांगितले. या दुर्घटनेमुळे ठाणे लोकल १४ मिनिटे सीबीडी रेल्वे स्थानकात अडकून पडल्याने पनवेल येथून मुंबई-ठाण्याच्या दिशेने जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली.

logo
marathi.freepressjournal.in