मुंबई : सोशल मिडीयावर स्वतःचे युट्यूब चॅनेल अपलोड करून फॉरेक्स मार्केटिंग गुंतवणुकीच्या माध्यमातून एका महिलेची फसवणूक करणाऱ्या आकाश महेंद्र पवार या वॉण्टेड आरोपीस दहिसर पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांनी सातारा येथून अटक केली. ४६ वर्षांची तक्रारदार महिला ही दहिसर येथे राहते. नोव्हेंबर २०२२ रोजी ती यूट्यूबवर आयएक्स ग्लोबल फॉरेक्स मार्केटिंगबाबतचा एक व्हिडीओ दिसला होता. तिने लिंकवरील मोबाईलवर संपर्क साधला असता, तिला आकाश पवारने ग्लोबल मार्केट गुंतवणुकीची माहिती देत तिला गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले हाते. त्यातून तिला २५ ते ३० हजार परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे तिने १५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत २ लाख ८७ हजाराची गुंतवणूक केली होती; मात्र कुठलाही परतावा न देता तिची फसवणूक केली होती. त्यामुळे तिने दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.