मुलुंडमध्ये महिलेची विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी; वृद्धाची आत्महत्या
मुंबई : मुलुंडमध्ये पार्किंगच्या भांडणादरम्यान महिलेने विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिल्याने वृद्धाने लोकलखाली आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खुशाल दंड (वय ६७) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मुलुंड पश्चिमेतील एका इमारतीमधील पार्किंगवरून कुमकुम मिश्रा आणि खुशाल दंड यांच्यात वाद झाला होता. यावेळी या महिलेने दंड यांना विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर खुशाल दंड प्रचंड अस्वस्थ झाले होते. याच तणावातून त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेनखाली आत्महत्या केली. याप्रकरणी दंड यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून कुमकुम मिश्राच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मुलुंड पोलिसांनी दाखल केला आहे. तसेच कुमकुम मिश्राला अटकही करण्यात आली होती. मात्र, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे समजते.