मुंबई महापालिकेत महिला कर्मचारी असुरक्षित

एका वर्षात महिला छेडछाडीच्या तब्बल ३३ तक्रारी
मुंबई महापालिकेत महिला कर्मचारी असुरक्षित

मुंबई महापालिकेसह २४ विभाग कार्यालयांमध्ये तब्बल एक लाख, दोन हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असली तरी महिला छेडछाडीचे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२१ या वर्षात तब्बल ३३ तक्रारी महिला कर्मचाऱ्यांची छेडछाड केल्याच्या आहेत. ३३ पैकी २५ प्रकरणांत महिला कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी देशाचा आर्थिक गाडा हाकणाऱ्या मुंबई महापालिकेत महिला कर्मचारी असुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबईत महिला सुरक्षित असे बोलले जात असले तरी गेल्या काही वर्षांत महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुंबईत महिला सुरक्षित आहेत का, असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई महापालिकेची जगभरात ओळख निर्माण झाली आहे. मुंबईचा विकास करण्यापासून करदात्या मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे काम मुंबई महापालिकेच्या माध्यमातून होत असते. मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेत एक लाखाहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

पुरुषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या महिलांना सुरक्षित वाटावे व महिला छेडछाडीचे प्रकार समोर आल्यास त्याची चौकशी करत महिला कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पालिका मुख्यालयासह २४ वॉर्ड, रुग्णालये, शाळा या ठिकाणी तक्रार समिती स्थापन करण्यात आली आहे. एकूण ९२ तक्रार समित्या असून सावित्रीबाई फुले स्त्री संशोधन केंद्राच्या माध्यमातून ९२ समित्यांशी समन्वय राखण्यात येतो. २०२१ या वर्षांत महिला कर्मचाऱ्यांना छेडछाड अशा ३३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रारींची समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली असून ३३ पैकी २५ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तर अन्य आठ तक्रारींची चौकशी सुरू आहे, असे मुंबई महापालिकेच्या परळ येथील सावित्रीबाई फुले स्त्री संशोधन केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in