समुद्राच्या उंच लाटांचे मोठे आव्हान पेलत कोस्टल रोडचे काम वेगाने सुरुच

प्रकल्पाचे ५५.२२ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती कोस्टल रोड प्रकल्पाचे मुख्य अभियंता चक्रधर कांडळकर यांनी दिली
समुद्राच्या उंच लाटांचे मोठे आव्हान पेलत कोस्टल रोडचे काम वेगाने सुरुच

पावसाळ्यात कोस्टल रोडच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी योग्य ते नियोजन केले आहे. समुद्रात भरतीच्या वेळी उंच लाटा उसळल्या तरी कोस्टल रोडचे काम वेगाने सुरुच राहणार आहे. उंच लाटापासून संरक्षण करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या भिंतीचे ७३ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर प्रकल्पाचे ५५.२२ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती कोस्टल रोड प्रकल्पाचे मुख्य अभियंता चक्रधर कांडळकर यांनी दिली.

मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि पालिकेच्या माध्यमातून प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान १०.५८ किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी १२ हजार ७२१ कोटी रुपयांचा खर्च पालिका करीत आहे. प्रकल्पातील पहिल्या बोगद्याचे काम या वर्षी ११ जानेवारी रोजी वेळेच्या एक दिवस आधीच पूर्ण झाले आहे. जानेवारी २०२३ पर्यंत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण होईल आणि डिसेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोड सेवेत येईल, असे ते म्हणाले.

पाणी उपशासाठी पंप

देशातील हा पहिलाच प्रयोग असून बोगद्यांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी वायुविजनाची सकार्डो यंत्रणा वापरली जाणार आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पालिका नियंत्रण कक्ष, पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाला तत्काळ मेसेज जाऊन मदत घेता येणार आहे. अतिवृष्टीमुळे पाणी साचले, तर पाणी उपशासाठी पंप तैनात ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती कांडळकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in