वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेचे काम अद्यापही अर्धवटच...

प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी दोन ते अडीच वर्षांहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेचे काम अद्यापही अर्धवटच...

वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेचे काम संथगतीने सुरू असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मागील ४ वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रकल्पाचे काम अद्याप ६० टक्के शिल्लक आहे. परिणामी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी दोन ते अडीच वर्षांहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मेट्रो ४ ही मार्गिका ३२.३२ किलोमीटर लांबीची आहे. या मार्गिकेवर ३२ स्थानके असणार आहेत. या मार्गिकेसाठी सुमारे १४ हजार ५४९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकूण पाच पॅकेजमध्ये या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. मेट्रो ४ मार्गिकेच्या कामाला २०१८मध्ये सुरुवात करण्यात आली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) २०२०मधील नियोजनानुसार ऑक्टोबर २०२२पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, करोनामुळे लागू केलेली टाळेबंदी आणि अन्य कारणाने प्रकल्पाचे काम काहीसे संथ झाले होते. त्यातच मेट्रो ४ मार्गिकेच्या 'पॅकेज ८', 'पॅकेज १०' आणि 'पॅकेज १२'चे काम सुमारे आठ महिन्यांहून अधिक काळ बंद होते. कंत्राटदार आर्थिक गर्तेत सापडल्याचा फटका मेट्रो मार्गिकेच्या कामाला बसला. त्यातून प्रकल्पाचे काम चांगलेच रखडले आहे. सद्यस्थितीत या मेट्रो मार्गिकेच्या दोन पॅकेजची ५० टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, अन्य तीन पॅकेजची कामे बरीच प्रलंबित आहेत. या तीन पॅकेजच्या कामासाठी कंत्राटदारामार्फत आता उपकंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या तीन पॅकेजमधील कामांनी अजूनही अपेक्षित गती पकडली नसल्याची स्थिती आहे. दरम्यान, या मेट्रो मार्गिकेच्या कामांना विलंब होत असल्याचा फटका प्रकल्पाला बसणार आहे.

'मेट्रो ४ अ'चे काम वेगात

वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेचा गायमुखपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. कासारवडवली ते गायमुख या मेट्रो ४ अ मार्गिका २.६७ किमी लांबीची असून, दोन स्थानके असतील. या मेट्रो मार्गिकेच्या स्थानकांची १९.१२ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तर वायडक्टची ३९ टक्के कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती 'एमएमआरडीए'कडून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in