मुंबई : बोरिवलीतील एका निर्माणधीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून ५३ वर्षांच्या कामगाराचा मृत्यू झाला. बाळासाहेब प्रभू टेकाळे ऊर्फ बालाजी असे या कामगाराचे नाव असून, त्यांच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध बोरिवली पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे. त्यात जेकेडी इंजिनिअर्स ऍण्ड इंफ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे विकासकासह बलविंदर बच्चनसिंग कलसी, साहेबसिंग गुरदितसिंग विल्फू, शराफत आजादअली शेख आणि सत्येंद्र प्रजापती यांचा समावेश आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी चार वाजता बोरिवलीतील शिंपोली रोड, कस्तुरपार्कच्या असीम सोसायटीच्या बांधकाम साईटवर घडली. बाळासाहेब हे बोरिवलीतील एका बांधकाम साईटवर काम करतात. शनिवारी सायंकाळी बाळासाहेब हे चौथ्या मजल्यावर सळई फिटींगचे काम करत होते. काम करताना त्यांचा तोल गेला आणि चौथ्या मजल्यावरून खाली पडले होते. गंभीररीत्या जखमी झालेल्या बाळासाहेब यांना तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने जवळचया जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी वर्षा टेकाळे हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी विकासकासह सुपरवायझर सत्येंद्र प्रजापती लेबर कॉन्ट्रक्टर शराफत शेख तसेच कंपनीचे कॉन्ट्रक्टर बलविंदर आणि साहेबसिंग यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून, लवकरच या सर्वांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.