चौथ्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू

 चौथ्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू
Published on

पनवेल तालुक्यातील आष्टे गावातील शिवानी हेरिटेज या इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या ओपन टेरेसवरील स्लॅबचे काम करताना खाली पडून फेब्रुवारी महिन्यात मरण पावलेल्या कामगाराला कंत्राटदाराने कुठल्याही प्रकारची सुरक्षिततेची साधने पुरविली नसल्यानेच सदरचा कामगार खाली पडून त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पनवेल तालुका पोलिसांनी संबधित कंत्राटदाराविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंत्राटदाराचे नाव रविंद्र शंकर धोत्रे (३६) असे असून त्याने गत फेब्रुवारी महिन्यामध्ये पनवेल तालुक्यातील आजिवली आष्टे गावातील शिवानी हेरिटेज या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ओपन टेरेसला स्लॅब टाकण्याचे काम हाती घेतले होते. त्यासाठी त्याने लेबर म्हणून राजूसिंग राठोड व विकास शर्मा या दोघांना घेतले होते. दोन्ही रूमवरील स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी सकाळी कंत्राटदार धोत्रे याने दोघा कामगारांना टेरेसच्या छताचे फ्लेट काढण्यास सांगून पनवेल येथे कामाच्या निमित्ताने निघून गेला. यावेळी विकास शर्मा हा लेबर चौथ्या मजल्यावरील बाहेरील बाजूस असलेल्या खिडकीमध्ये उभा राहुन सेंट्रिंगच्या फ्लेट काढत होता. यावेळी त्याचा तोल गेल्याने तो खाली पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला आष्टे गावातील लोकांच्या मदतीने पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापुर्वीच मृत झाल्याचे घोषीत केले. पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकरणात आकस्मात मृत्यूची नोंद करुन या घटनेचा अधिक तपास केला असता, सदर इमारतीच्या टेरेसचे स्लॅब टाकण्याचे काम घेणाऱ्या कंत्राटदाराने चौथ्या मजल्यावर बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची सुरक्षेची जाळी, अथवा सुरक्षेचे इतर कोणतीही साधने पुरविली नसल्याचे आढळुन आले.

logo
marathi.freepressjournal.in