मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे आजच्या घडीला खाण्यापिण्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपणच आजारांना आमंत्रण देत आहोत. ‘स्टेप्स’ सर्वेक्षणानुसार, १८ ते ६९ वर्ष या वयोगटातील सुमारे ३४ टक्के नागरिक रक्तदाबाचे शिकार झाले आहेत. तर ऑगस्ट २०२२ पासून आतापर्यंत ३ लाख ५० हजार व्यक्तींची आरोग्य तपासणी केलेल्या व्यक्तींपैकी ९.७ टक्के व्यक्तिंमध्ये उच्चरक्तदाब आढळून आला आहे.
जानेवारी २०२३ पासून झोपडपट्टी व तत्सम वस्तींमध्ये, आरोग्य स्वयंसेविका, आशा सेविका यांच्यामार्फत ३० वर्षांवरील १८ लाख व्यक्तींची तपासणी केली असता, १७ हजार व्यक्तींना उच्चरक्तदाब असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे धावपळीच्या जीवनात आपणच आजाराला आमंत्रण देत असून मुंबई उच्च रक्तदाबाची शिकार झाली आहे. शुक्रवार १७ मे रोजी ‘जागतिक उच्च रक्तदाब दिन’ आहे.
जागतिक स्तरावर उच्च रक्तदाब असलेल्यांपैकी अंदाजे ४६ टक्के लोकांना हे माहित नसते की त्यांना उच्चरक्तदाब आहे. उच्च रक्तदाब असलेल्या सर्व प्रौढांपैकी अर्ध्यापेक्षा कमी लोकांचे निदान आणि उपचार केले जातात. उच्च रक्तदाब असलेल्या ५ पैकी केवळ १ प्रौढ व्यक्तीचा रक्तदाब हा नियंत्रणात असतो. त्यामुळे ८० टक्के लोकांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, अनियमित हृदय-ठोके आणि मूत्रपिंडाचे नुकसान यासह गुंतागुंत होण्याचा धोका असतो. जागतिक रक्तदाब दिन १७ मे २०२४ साठी यंदाचे वर्षीचे घोषवाक्य 'आपला रक्तदाब मोजा, त्यावर नियंत्रण ठेवा, दीर्घायुष्य जगा' हे आहे.
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मधुमेह आणि उच्च रक्तदाब विषयक आरोग्य चाचणी करून उपचार घेण्यासाठी मुंबईकरांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे.
मिठाचे ८.६ टक्के सेवन आरोग्यास घातक
जागतिक आरोग्य संघटनेना आणि पालिकेमार्फत केलेल्या स्टेप्स सर्वेक्षणानुसार, १८ ते ६९ वर्ष या वयोगटातील सुमारे ३४ टक्के नागरिकांमध्ये रक्तदाब वाढल्याचे नोंदवले आहे. त्यापैकी ७२ टक्के नागरिक हे सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे निदर्शनास आले. उपचार घेणाऱ्या नागरिकांपैकी फक्त ४० टक्के नागरिकांचा रक्तदाब नियंत्रणात असल्याचा आढळून आले. सरासरी दैनंदिन मिठाचे सेवन ८.६ ग्रॅम इतके असल्याचे आढळून आले आहे, जे जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीपेक्षा जास्त आहे.
९.७ टक्के मुंबईकरांना उच्च रक्तदाब
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात प्रत्येक महिन्यात ६० ते ७० हजार नागरिकांची मधुमेह व रक्तदाब तपासणी होते. यात सुमारे १ लाख दहा हजार रुग्ण नियमितपणे उच्च रक्तदाबावर उपचार घेत आहेत, तर ३० वर्षेपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींची चाचणी करण्याच्या दृष्टीने पालिकेने आपल्या २६ रुग्णालयांमध्ये ऑगस्ट २०२२ पासून मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी केंद्र सुरू केले आहेत. तपासणी केलेल्या ३ लाख ५० हजार व्यक्तींपैकी ९.७ टक्के व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब संशयित आढळून आले. या सर्व व्यक्तींना संपर्क साधून, पाठपुरावा करून, त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.