जागतिक मलेरिया दिन; ५० हजार घरांची झाडाझडती

वर्षभरात ॲनोफिलीस डासांची तब्बल १० हजार उत्पत्ती स्थाने नष्ट
जागतिक मलेरिया दिन; ५० हजार घरांची झाडाझडती

मलेरियाचा प्रसारास कारणीभूत ‘ॲनोफिलीस स्टिफेन्सी’ या प्रजातीच्या डासांची तब्बल १० हजार ७८८ डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट केली. हिवताप (मलेरिया) नियंत्रणाच्या मोहिमे अंतर्गत १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागाने ही कार्यवाही केली आहे. दरम्यान, ४९ हजार ४७६ घरांची झाडाझडती घेण्यात आल्याची माहिती जागतिक मलेरिया दिनाच्या निमित्ताने कीटकनाशक खात्याद्वारे देण्यात आली आहे.

१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कीटकनाशक विभागामार्फत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये साधारणपणे ४९ हजार ४७६ घरांची झाडाझडती घेण्यात आली. या झाडाझडतीत एकूण ४ लाख ४७ हजार १८८ पाण्याच्या टाक्यांची तपासणी करत ४ लाख २८ हजार १९६ पाण्याच्या टाक्यांमध्ये औषध फवारणी करण्यात आली. तपासणी दरम्यान एकूण १० हजार ७८८ इतक्या मोठ्या प्रमाणात ॲनोफिलीस या डासांची उत्पत्ती स्थाने आढळली. ही उत्पत्ती स्थाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित चमूद्वारे तत्काळ नष्ट करण्यात आली. त्यामुळे डासांच्या भविष्यातील उपद्रवास प्रतिबंध करण्यात आल्याने मलेरियाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले आहे. दरम्यान, या मोहिमेदरम्यान कीटकनाशक खात्यातील १ हजार ५०० कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सहभागी होत तपासणी केली.

अशी केली कार्यवाही

ॲनोफिलीस या डासांची वर्षभरात १० हजार ७८८ एवढी उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात आली. यात सर्वाधिक म्हणजे २ हजार ४१८ एवढी उत्पत्तीस्थळे जुलै २०२२ मध्ये नष्ट करण्यात आली, तर ऑगस्ट महिन्यात २ हजार १२८, जून महिन्यात १ हजार ४९६, सप्टेंबर महिन्यात १ हजार ३३७ इतकी उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात आली आहेत.

मादी डासामुळे ४०० ते ६०० डासांची उत्पत्ती!

डासांच्या प्रत्येक उत्पत्तीस्थानाच्या ठिकाणी एकावेळी एक मादी डास १०० ते १५० अंडी घालते. एका मादी डासाचे सरासरी आयुर्मान हे ३ आठवड्यांचे असते. या तीन आठवड्यांच्या कालावधीत मादी डास किमान ४ वेळा साचलेल्या पाण्यात अंडी घालते. म्हणजेच एका मादी डासामुळे साधारणपणे ४०० ते ६०० डास तयार होत असतात. हे डास मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांच्या प्रसारास कारणीभूत ठरतात.

आठवड्यातील एक दिवस 'कोरडा दिवस' !

साचलेल्या काही थेंब पाण्यातही डास अंडी घालतात. अनेक घरांच्या बाहेर पाणी साठवण्यासाठी पिंप वा ड्रम ठेवलेले असतात. यातील पाण्यात डासांच्या अळ्या वेळोवेळी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यासाठी हे पिंप व इतर पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडी ठेवून आठवड्यातून एक दिवस 'कोरडा दिवस' म्हणून पाळावा. या दिवशी पाणी साठवण्याची भांडी - पिंप इत्यादी प्रथम पूर्णपणे उलटे करुन ठेवावीत. त्यानंतर काही वेळाने हे पिंप व इतर भांडी कोरड्या व स्वच्छ कापडाने आतून पुसावीत. भांडी कोरड्या व स्वच्छ कापडाने पुसत असतांना ती दाब देऊन पुसावीत, जेणेकरुन पिंपाच्या आतील बाजूला चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील.

येथे मलेरिया डासांची उत्पत्ती!

मलेरियाच्या बाबतीत सुद्धा मलेरियाचे परजीवी (Plasmodium Species) पसरविणा-या `ऍनॉफिलीस स्टीफेन्सी' डासाची उत्पत्ती साचलेल्या स्वच्छ पाण्यात होते. या प्रकारच्या डासांची प्राधान्य उत्पत्तीस्थळे ही मुख्यतः विहिरी, पाण्याच्या टाक्या, कारंजे, कूलींग टॉवर, पाण्याचे हौद, इमारत बांधकामाच्या ठिकाणी साचवलेले पाणी इत्यादी आहेत.

अशी घ्यावी खबरदारी !

घराशेजारील परिसरात असणारे टायर्स, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्यांची झाकणे, पाण्याचे पिंप, मनी प्लांट - बांबू यासारख्या शोभेच्या झाडांसाठी ठेवण्यात येणारे पाणी, काचेची किंवा धातूची कासवाची मूर्ती ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, कुंड्यांखालील ताटल्या, यासारख्या विविध वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचते व या पाण्यातही डास अंडी घालतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या निरुपयोगी वस्तू त्वरित नष्ट कराव्यात, असेही आवाहन महापालिकेच्या कीटकनाशक खात्याने यानिमित्ताने केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in