मुंबई शहर आणि उपनगरात आता वृक्षांऐवजी सिमेंट-काँक्रीटचे जंगल उभे राहत आहे. परिणामी ज्यांच्या किलबिलाटाने एकेकाळी दिवसाची सुरुवात हॉट होती, ती चिमणी (World Sparrow Day 2023) आजकाल दुर्मिळ होऊ लागली आहे. या चिमण्या नवी मुंबई, ठाणे, रायगड परिसरांत स्थलांतरित होत आहेत, त्यामुळे मुंबईतील चिमण्यांची संख्या घटली आहे. दरम्यान, मुंबईमधील चिमण्यांची संख्या वाढविण्यासाठी बर्ड हाऊस संकल्पना राबविण्यास शहरात सुरुवात झाली आहे. त्यामुळे घरालगत, इमारतीतील उद्याने आणि अडगळीच्या ठिकाणी हे बर्ड हाऊस लावल्याने ही संख्या काही पटीत वाढण्यास मदत होईल, अशी आशा पक्षीप्रेमींना आहे. सध्या मुंबईत ७० टक्के चिमण्या घटल्याने पक्षी प्रेमी हळहळ व्यक्त करत आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरांत होणाऱ्या विकासकामांमुळे मुंबईत आता वृक्षांऐवजी सिमेंट-काँक्रीटचे जंगल उभे राहिले आहे. त्यातच मोबाईल टॉवर्सचे रेडिएशन, वृक्षतोड, घरट्यांची घटलेली संख्या, वाढलेले कावळे, कबुतर आणि मोठ्या पक्षांची संख्या यामुळे चिमण्यांची संख्या घटली आहे. राणीची बाग, धारावी येथील निसर्गउद्यान, बीकेसी येथील मिठी नदीचा परिसर, आरे कॉलनी, बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर तसेच भांडुपसह लगतच्या परिसरातील हिरवळ आणि तिवरांच्या परिसरांत चिमण्या आढळून येत असल्या, तरी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे. मुंबईतील पर्यावरणाची हानी होत असून, त्याचा फटका मनुष्यप्राण्यांसह पक्ष्यांनाही बसत आहे. गेल्या काही वर्षांत मुंबई झपाट्याने बदलली आहे. परिणामी बदलत्या परिस्थितीशी चिमण्यांना जुळवून घ्यावे लागत असले, तरी त्याचा फटका त्यांच्या जीवनशैलीला बसत आहे. मुंबईत कमी होणारी झाडे, माणसाच्या बदललेल्या खाण्याच्या सवयी, वाढते आधुनिकीकरण, गगनचुंबी इमारतींत होणारी वाढ यांमुळे चिमण्या मुंबई सोडून उपनगरांत स्थलांतरित हॉट आहेत. तर अनेक ठिकाणी चिमण्यांची उत्पतीस्थानेच नष्ट झाल्याने हे प्रमाण घटले आहे.
मुंबईतील चिमण्यांचे स्थलांतर थांबवायचे असेल किंवा त्यांचे प्रमाण वाढवायचे असेल, तर त्यांना आवश्यक अधिवास तयार करण्याची गरज आहे. अधिकाधिक हिरवळ तयार करण्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. शिवाय आपण राहतो त्या ठिकाणी चिमण्यांसाठी अन्न देणे, त्यांना पाणी देणे, त्यांच्यासाठी कृत्रिम घरटी बनविणे, आदी उपाय करणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून असे उपाय केले जात आहेत; मात्र हे प्रमाण तुलनेने कमी आहे. ज्या पद्धतीने पर्यावरणाचा विनाश होत आहे, त्याच्या दुप्पट वेगाने पर्यावरण संवर्धनासाठी काम झाले पाहिजे. तेव्हा कुठे पक्षी संवर्धन यशस्वी होईल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
'ही' आहेत चिमण्या नष्ट होण्याची कारणे
-झाडांची संख्या कमी होणे
-वाढत्या शहरीकरणाने सिमेंटची जंगले वाढणे
-मुंबईत काचेच्या इमारती, चाळ संस्कृतीचा ऱ्हास यामुळे घरटे बांधता येत नाही. मुंबईत चिमण्यांची संख्या घटली आहे.
- जुन्या किराणा दुकानांऐवजी आधुनिक किराणा दुकाने मॉल वातानुकुलित झाली आहेत. शिवाय धान्य पूर्वीसारखं गोणीत नाही, तर प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवले जाते. त्यामुळे चिमण्यांना धान्य खाण्यास उपलब्ध होत नाही.
- शेतकरी पिकांना किटक लागू नये म्हणून रासायनिक फवारणी करतात. यामुळे किटकांचा नाश होतो. पण त्यासोबतच रासायनिक फवारणी केल्यानं चिमण्यांना खाता येत नाही.
-किरणोत्सर्गी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आणि मोबाइल टॉवर्सनी तयार केलेले रेडिएशन चिमण्यांवर परिणाम करते. चिमण्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करते. तसेच त्यांच्या मज्जासंस्थेचे देखील नुकसान करते.
-मुंबईत कचऱ्याची समस्या कावळे आणि भटक्या कुत्र्या-मांजरींच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे.
"कावळा आणि कबुतरांना असलेला धार्मिक आधार चिमण्यांना नसल्याने कायमच चिमण्या दुर्लक्षित राहिल्या आहेत. चिमण्यांची संख्या वाढविण्यासाठी 'बर्ड हाऊस'ची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था यासाठी पुढे आल्या आहेत. या 'बर्ड हाऊस'मुळे चिमण्यांना वास्तव्य निर्माण होऊ लागले; मात्र प्रत्येक इमारती, प्रत्येक संस्था, ऑफिसेस आणि विशेषतः समाजातील प्रत्येक व्यक्तींचा यात पुढाकार असणे गरजेचे आहे. असे झाल्यास काही वर्षांत या संख्येत तुलनेने वाढ होईल."
-प्रमोद माने, स्पॅरो शेल्टर संस्था
"पाणी, हवा आणि हवा प्रदूषणाचा परिणाम चिमण्यांवर होऊ लागला आहे. दुसऱ्या प्रजातीपेक्षा या प्रजांतीवर हा फरक जास्त मोठ्या प्रमाणावर जाणवला आहे. त्यातच शहरीकरणामुळे सध्या त्यांची राहण्याची ठिकाणे नष्ट झाली आहेत. त्यांना प्रिय असणारी अशोकाची आणि त्या आकाराची झाडे देखील नाहीशी होत चालली आहेत. त्यामुळे आता अशा पद्धतीची झाडे वाढविण्याचे कार्य आणि बर्ड हाऊस या दोन गोष्टी करणे आपल्या हातात आहे."
-पवन शर्मा, रॉ प्राणी मित्र संघटना
पर्यावरणीय समतोलासाठी धोकादायक
आज,२० मार्च हा दिवस जगभरात जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महंमद दिलावर यांनी २००६ मध्ये ‘नेचर फॉरेव्हर सोसायटी’ नावाची एक संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या पुढाकारातून २०१० पासून जागतिक चिमणी दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. चिमण्यांची कमी होत असलेली संख्या पर्यावरणीय समतोलासाठी धोकादायक आहे. हेच लक्षात घेऊन नेचर फॉरेव्हर सोसायटीकडून जागतिक चिमणी दिनाची सुरुवात करण्यात आली. चिमणी हा पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक असल्याने, चिमण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जे लोक चिमण्यांच्या संवर्धनासाठी काम करतात अशा लोकांचा संस्थेच्या वतीने जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने सत्कार देखील करण्यात येतो.