जागतिक जल दिन विशेष; मुंबईत भविष्यात पाणीटंचाई

लोकसंख्येचा विचार करता पाण्याची गरज वाढणार, मुंबईकरांना 'पाणी हे अनमोल' याचा विसर
जागतिक जल दिन विशेष; मुंबईत भविष्यात पाणीटंचाई

वातावरणीय बदलामुळे पावसाचे आगमन लांबणीवर पडते किंवा अपेक्षाच्या तुलनेत कमी बरसतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, भारता सारख्या प्रगतशील देशात महाराष्ट्रासह अनेक राज्यांत दरवर्षी पाणीबाणीची स्थिती उद्भवते. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी नियोजन पद्धतीने स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा होतो; मात्र भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार याचे संकेत मिळत असताना ही मुंबईकर पाणी वाया घालवण्यात धन्यता मानतात. मुंबईला सद्यस्थितीत दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत असून, २७ टक्के पाणी चोरी व गळतीमुळे वाया जाते. तर भविष्यात वाढत जाणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता पाण्याची गरज वाढणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा, पाणी आडवा, पाणी जिरवा, पाण्याची गरज लक्षात घेता लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी २२ मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो; मात्र मुंबईत पाण्याची नासाडी पहाता मुंबईकरांना 'पाणी हे अनमोल' जल हैं तो जीवन हैं, पाण्याशिवाय मनुष्य, प्राणी, झाडे जगू शकत नाहीत, याचा विसर पडला असावा.

मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात पोहोचली असून, मुंबईकरांची रोजची तहान भागवण्यासाठी मुंबईपासून १२० किलोमीटर दूर अंतरावरून रोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबई महापालिकेच्या जल विभागाच्या माध्यमातून स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येतो. मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईकरांची रोजची तहान भागवली जाते. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. विशेष म्हणजे, मुंबईकरांना स्वच्छ व शुद्ध पाणी देण्यासाठी मुंबई महापालिका एक हजार लिटर पाणी शुद्ध करण्यासाठी २० रुपये खर्च करते; मात्र झोपडपट्टी, चाळी, आदिवासी पाडे याठिकाणी ४.७६ पैशांत एक हजार लिटर पाणी उपलब्ध करून देण्यात येतो. तर झोपडपट्ट्यातील निवासी, प्रकल्प बाधित इमारतीत ५.२८ पैशांत एक हजार लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो; मात्र मुंबईतील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची नासाडी होते. भविष्यात पाण्यासाठी युद्ध होणार असे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पाण्याची ओरड कानी पडते. परंतु मुंबईत पाणीबाणी अशी स्थिती निर्माण झाली नाही आणि होणार नाही, याची दक्षता तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे महत्त्व तू जाण याचा विचार आतापासूनच करणे काळाची गरज आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटीशकालीन असून, त्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे वारंवार पाणी गळतीचे प्रकार घडत असतात. पाणी गळती रोखण्यासाठी मुंबई महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते; मात्र पाणी गळती सुरूच असते. त्यामुळे पाणी गळती रोखण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, ते कुठे खर्च होतात हा संशोधनाचा भाग आहे. मायानगरी मुंबईत पाणीमाफिया मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून, पाणी चोरीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, असा आरोप याआधी अनेकदा सभागृह करण्यात आले आहेत. पाणी माफियांवर काही भ्रष्ट अधिकारी व भ्रष्ट राजकारण्यांचा आशिर्वाद आहे, असा आरोपही सर्वसामान्यांकडून केला जातो. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने पाणीमाफिया विरोधात कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे, असे मत दादर येथील महेश सुर्वे यांनी व्यक्त केले.

म्हणून साजरा केला जातो जागतिक जल दिन!

जगाला पाण्याच्या गरजेविषयी जागरूक करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक जल दिन साजरा करण्यास सुरूवात केली. १९९२ मध्ये ब्राझीलच्या रिओ दि जानेरो येथे आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेत जागतिक जलदिन साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर १९९३ पासून पाण्याच्या संरक्षणाचे महत्व समजून घेण्यासाठी सामुदायिक जागरूकता वाढविण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जाऊ लागला. पहिल्या जागतिक जलदिवसाचे आयोजन २२ मार्च १९९३ साली करण्यात आले होते.

'या' गोष्टींची काळजी घ्या!

-पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करणे.

-पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे.

-जगात गोड्या पाण्याच प्रमाण मुळातच फार कमी आहे.

-पिण्याचे पाणी सर्वांनाच गरजेप्रमाणे मिळेल हे पाहणे.

-स्वत: ला खरोखरी किती पाण्याची गरज आहे हे समजून घेऊन तितकेच -पाणी प्रत्येकाने वापरले आणि या मुद्याचा प्रसार करणे गरजेचे

जागतिक जल दिन २२ मार्चलाच का?

२२ मार्च हा दिवस 'जागतिक जल दिवस' म्हणून साजरा करण्याची सुरुवात कोणी केली? आणि हाच दिवस का निवडला गेला? तर हा मान एका भारतीयाला जातो. जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ आणि स्टॉकहोम जल पुरस्काराचे विजेते डॉ. माधवराव चितळे यांनी हा प्रश्न सर्वप्रथम जागतिक मंचावर मांडला. त्यावर भरपूर चर्चा होऊन २२ मार्च हा दिवस निवडण्यात आला. सुरुवातीला हा दिवस निवडण्याबद्दल जलतज्ज्ञांत मतभेद होते. काही जण २२ मार्चबद्दल, तर काही जण २२ सप्टेंबरबद्दल आग्रही होते. विषुववृत्ताने पृथ्वीचे दोन भाग पडतात. वरचा एक भाग आणि खालील एक भाग. वरच्या भागातील देशांना २२ मार्च ही तारीख पसंत होती, तर खालच्या भागातील देश २२ सप्टेंबरबद्दल आग्रही होते. खालच्या भागातील देशांपेक्षा वरच्या भागात जास्त देश आहेत हे आपल्याला माहीत आहे. म्हणून त्यावर मतदान झाल्यावर २२ मार्च तारीख निश्चित झाली.

दूषित पाण्याच्या वर्षांला १० हजारांहून अधिक तक्रारी

स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येतो, असा दावा मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात येतो; मात्र दूषित पाण्यामुळे मुंबईकर हैराण झाले असून आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफाइड, कॉलरा, कावीळ असे आजार पसरतात. दरवर्षी मुंबईतील विविध भागांतून दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या हजारो तक्रारींची नोंद वर्षांला पालिका प्रशासनाकडे होत असते.

तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

२१ मार्च २०२३ पर्यंतची आकडेवारी

तलाव पाणीसाठा

भातसा २,८३,३७

अप्पर वैतरणा १३,७१४

मोडक सागर ४४,००४

तानसा ७४,७८२

मध्य वैतरणा ३१,७००

विहार १३,६४५

तुलसी ४,२०८

गेल्या तीन वर्षांचा २१ मार्च २०२३ पर्यंतचा जलसाठा (दशलक्ष लिटर)

२०२३ - ५,८८,३८९

२०२२ - ६,३०,५६२

२०२१ - ५,७९,५३

२७ टक्के पाणी चोरी, गळतीचे प्रकार!

पालिकेतर्फे मुंबईत दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यापैकी चोरी आणि गळतीमुळे २७ टक्के म्हणजे सुमारे ७०० ते ८०० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. यावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेचा प्रयत्न सुरु असला तरी अजूनही पालिकेला यश आलेले नाही. त्यामुळे आता पाणी धोरणाच्या अंमलबजावणीतून गळती, चोरी रोखली जाईल. तसेच दूषित पाण्याच्या समस्याही कमी होण्यास मदत होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

'सर्वांना पाणी'; चार महिन्यांत ७०० कुटुंबीयांना कनेक्शन!

सर्वांना पाणी योजनेअंतर्गत आतापर्यंत सहा हजारांहून अधिक अर्ज नळ कनेक्शनसाठी प्राप्त झाले होते. यापैकी सुमारे ७०० कुटुंबियांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. दहिसर येथील गणपत पाटील, मानखुर्द, महाराष्ट्र नगर येथील भीमनगर व मालाड पश्चिम येथील अंबूजवाडी या वसाहतीत जलजोडण्याचे काम झाले आहे. वर्सोव्यातील सिध्दार्थ नगर येथे प्रक्रिया सुरू झाली असून, पुढील महिन्यात जलजोडण्यांचे काम पूर्ण होईल, असे पालिकेच्या जलविभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in