

मुंबई : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामधील पुनर्वसन इमारत क्र. १ मधील विंग 'एफ', 'जी' व विंग 'एच' या विंगला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या इमारतींमधील ८२७ पात्र रहिवाशांना पुनर्वसन घरांचे वितरण गुरुवारपासून करण्यात येणार आहे. वरळीतील सुमेर केंद्र इमारतीच्या म्हाडा साईट कार्यालयात रहिवाशांना घराचे वितरण पत्र देण्यात येणार आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता म्हाडा सुकाणू अभिकरण (नोडल एजन्सी) आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामधील पुनर्वसन इमारत क्र. १ मधील विंग 'एफ', 'जी' व विंग 'एच' या विंगला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. सदर विंगमधील एकूण ८२७ पुनर्वसन घरांचे वितरण मंडळातर्फे करण्यात येणार आहे.
यावेळी सर्व पात्र रहिवाशांना वितरण पत्र प्रदान करण्यात येणार आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत सार्वजनिक सुट्टी सोडून सदर वितरण पत्रांचे वाटप केले जाणार आहे. वितरण पत्र/ ताबा स्वीकारतेवेळी लाभार्थ्यांनी पुनर्वसन घराचा करारनामा, आधार कार्ड व पॅन कार्डची छायांकित प्रत, संक्रमण शिबिर सदनिकाधारकांचे हमीपत्र (रु. ५००/- च्या स्टँप पेपरवर नोंदणीकृत नोटरी केलेले), घरधारकाचे पासपोर्ट साईजचे ३ नवीन रंगीत फोटो, पुनर्वसित घरामध्ये सोबत वास्तव्य करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो (पोस्टकार्ड साईज) या आवश्यक कागदपत्रांसह रहिवाशांनी व्यक्तीशः उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे घरमालकांना आवाहन
त्याचबरोबर मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, निवासी घरांचे वितरण विंग 'एफ', 'जी' व 'एच' या क्रमाने करण्यात येणार आहे. वितरण पत्र स्वीकारण्याबाबतचे वेळापत्रक वरील नमूद ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यानुसार, घरमालकांनी वरील ठिकाणी स्वतः उपस्थित राहून सदनिकेचे वितरण पत्र स्वीकारावे व त्यानंतर सदनिकेचा ताबा घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.