मोठी बातमी! वरळी 'हिट अँड रन' प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक

वरळीतील 'हिट अँड रन' प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहला पोलिसांनी आज शहापूरमधून अटक केली.
मोठी बातमी! वरळी 'हिट अँड रन' प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक

मुंबई : वरळीतील 'हिट अँड रन' प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहला पोलिसांनी आज शहापूरमधून अटक केली. वरळीतील अपघातानंतर मिहीर शाह फरार होता. दरम्यान अपघातानंतर पोलिसांनी मिहीर याचे वडील राजेश शाह यांना ताब्यात घेतलं होतं. त्यांना काल कोर्टानं जामीन मंजुर केला होता.

प्रदीप लिलाधर नाखवा हे मासेमारी करत असून ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत वरळीतील कोळीवाडा, शंकर देवळासमोरील नाखवा हाऊसमध्ये राहतात. रविवारी ते त्यांची पत्नी कावेरीसह मनीष मार्केटमध्ये मासे आणण्यासाठी गेले होते. यावेळी भरवेगात जाणाऱ्या एका बीएमडबल्यू कारने त्यांच्या स्कूटरला धडक दिली होती. या अपघातात कावेरी प्रदीप नाखवा हिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी भादंविसह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा नोंद होताच पोलिसांनी कारचा मालक राजेश शहा आणि त्यांचा चालक राजऋषी बिदावत या दोघांना अटक केली होती. अटकेनंतर या दोघांनाही सोमवारी दुपारी शिवडीतील स्थानिक न्यायायात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.

अपघातावेळी मिहीर शहा हा कार चालवत होता, तर चालक राजऋषी हा कारच्या मागे बसला होता. भरवेगात कार चालविण्याच्या प्रयत्नात मिहीरने प्रदीप यांच्या स्कूटरला धडक दिली. त्यात त्यांच्या पत्नीचा पदर कारच्या बोनेट आणि टायरमध्ये अडकला, त्यामुळे तो तिला बोनेटवरून दीड किलोमीटर फरफरत घेऊन गेला. काही अंतर गेल्यानंतर या दोघांनी तिचा पदर काढून तिला तिथेच टाकून पलायन करण्याचा प्रयत्न केला. त्यात कारच्या चाकाखाली आल्याने कावेरी या गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. वांद्रे येथील कलानगर परिसरात गेल्यानंतर त्यांची कार बंद पडली. यावेळी मिहीरने घडलेला प्रकार त्याचे वडील राजेश शहा यांना सांगितला. यावेळी राजेशने मिहीरला कार तिथेच टाकून मोबाईल बंद करून पळून जाण्याचा सल्ला दिला होता.

राजऋषीला अपघाताच्या वेळेस तोच कार चालवत असल्याचे सांगण्यास सांगितले. या दोघांच्या जबानीतून हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगून त्यांच्या चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. या गुन्ह्यानंतर मिहीर हा पळून गेल्याने त्याचा ठावठिकाणा राजेश शहा यांना माहित आहे, त्यामुळे त्यांच्याकडून मिहीरची माहिती काढून त्याला या गुन्ह्यांत अटक करायची, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राजेश शहा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली तर राजऋषीला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राजेश शहा यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन सायंकाळी त्यांची १५ हजारांच्या जामिनावर सुटका करण्यात आली होती.

वरळी हिट अँड रनप्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शहा फरार असला तरी रविवारी अटक केलेले त्याचे वडील राजेश दामजी शहा यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर १५ हजारांच्या जामिनावर सुटका करण्यात आली. मिहीरचा कारचालक राजऋषी राजेंद्रसिंह बिदावत याला मात्र न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे मंगळवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी मिहीर राजेश शहा हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी सहा विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in