Mihir Shah: मुंबई : वरळी येथे बेदरकारपणे कार चालवून निष्पाप महिलेचा बळी घेतल्या प्रकरणी अटकेत असलेला मिहीर शहा आणि त्याचा गाडी ड्रायव्हर राजऋषी बिडावत यांनी यांच्या बेकायदेशीर अटकेला आव्हान दिलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने आठवड्याभरात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश पोलीसांना दिले.
मिहीरने ७ जुलैला दारूच्या नशेत बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवत दुचाकीवर असलेल्या नाखवा दाम्पत्याला जोरदार धडक दिली. त्यात कावेरी नाखवा (४५) या महिलेचा मृत्यू झाला. मिहीरने गाडीखाली चिरडलेल्या कावेरी यांना निर्दयीपणे वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंत फरफटत नेले होते. घटनेनंतर फरार झालेल्या मिहीरला ९ जुलैला विरारच्या रिसॉर्टमधून पोलीसांनी अटक केली. पोलीसांच्या अटकेच्या कारवाईला आक्षेप घेत मिहीर शहा याने याचिका दाखल केली. पोलीसांनी अटक करताना अटकेची कारणे सांगण्यात आली नव्हती. त्यामुळे, आपली अटक ही बेकायदा असल्याचा दावा करून मिहीर याने त्याची तातडीने जामिनावर सुटका करण्याची विनंती न्यायालयाला केली.
या याचिकेवर न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली. न्यायालयाने पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी २९ ऑगस्टला निश्चित केली.