मुंबईतील 'हिट अँड रन' प्रकरणाचं शिवसेना कनेक्शन समोर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

वरळी 'हिट अँड रन' प्रकरणात पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांना पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबईतील 'हिट अँड रन' प्रकरणाचं शिवसेना कनेक्शन समोर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

मुंबई: पुणे पोर्श कार 'हिट अँड रन' प्रकरण ताजं असतानाच आता मुंबईतील वरळीमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. मच्छी आणण्यासाठी निघालेल्या एका दांपत्याच्या दुचाकीला एका अलिशान बीएमडब्ल्यू कारनं पाठीमागून जोरदार धडक दिली आणि त्यानंतर या दोघांनाही दुचाकीसह फरपटत नेलं. वरळीतील अॅट्रीया मॉल परिसरात आज पहाटे साडे पाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणात आरोपी शिवसेना शिंदे गटाशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याला अटक:

वरळी 'हिट अँड रन' प्रकरणात पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांना पोलिसांनी अटक केली आहे. अपघातावेळी राजेश शाह यांचा मुलगा मिहीर आणि त्यांचा ड्रायव्हर कारमध्ये होते. मिहीर स्वत: गाडी चालवत असल्याचं समजतंय. दरम्यान पोलिसांनी या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीनं केलं होतं मद्यपान, बारच्या बिलाचा फोटो व्हायरल-

दरम्यान आरोपी मिहीर यानं मद्यपान केल्याचं समोर आलं आहे. जुहूतील व्हॉईस ग्लोबल तापस बार या बारमध्ये त्याने मित्रांसोबत पार्टी केली होती. त्याचं बिल सुमारे १८ हजार रुपयांचं झालं होतं. या बारच्या बिलचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की...

वरळी हिट अँड रन प्रकरणावर शिंदे गटाच्या नेत्याचं नाव समोर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "कायद्यासमोर सर्व समान आहेत. सरकार देखील सगळ्या घटनांकडे समान पाहते. त्यामुळे या घटनेत वेगळा न्याय दिला जाणार नाही. जे होईल ते कायदेशीररित्या होणार आहे. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही."

logo
marathi.freepressjournal.in