वरळी 'हिट अँड रन' प्रकरणातील आरोपीनं प्यायलं एवढ्या हजारांचं मद्य, बारच्या बिलाचा फोटो व्हायरल

वरळी 'हिट अँड रन' प्रकरणातील आरोपीनं मुंबईतील एका बारमध्ये मद्यप्राशन केल्याचं समोर आलं आहे.
वरळी 'हिट अँड रन' प्रकरणातील आरोपीनं प्यायलं एवढ्या हजारांचं मद्य, बारच्या बिलाचा फोटो व्हायरल

राज्यात 'हिट अँड रन'चा सिलसिला सुरुच आहे. मुंबईतील वरळीमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. मच्छी आणण्यासाठी निघालेल्या एका दांपत्याच्या दुचाकीला एका अलिशान कारनं पाठीमागून जोरदार धडक दिली आणि त्यानंतर या दोघांनाही दुचाकीसह फरपटत नेलं. या घटनेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपीनं मद्यपान केल्याची माहिती समोर आली असून त्याच्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बारमध्ये पार्टी, तब्बल १८ हजारांचं बिल...

पुणे पोर्श कार प्रकरण ताजं असतानाच मुंबईतील वरळीमध्ये 'हिट अँड रन'चा प्रकार समोर आला आहे. आज पहाटे एका भरधाव वेगातील बीएमडब्ल्यू कारनं दुचाकीवरून जाणाऱ्या एका दांपत्याला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अपघातातील आरोपी मिहीर शहा यानं मुंबईतील एका बारमध्ये मद्यसेवन केल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील जुहू येथील व्हॉईस ग्लोबल तापस बारमध्ये आरोपीनं मित्रांसोबत पार्टी केल्याची माहिती समोर आली आहे. या बारमध्ये त्यांचं १८,७३० रुपयांचं रुपयांचं बिल झालं असून या बिलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान याच बारमधून पहाटे वरळीच्या दिशेने जाताना बीएमडब्ल्यू कारचा अपघात झाल्याची माहिती आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला अटक:

दरम्यान वरळी 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांनी पालघरधील शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना ताब्यात घेतलं आहे. अपघातावेळी राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा आणि त्यांचा ड्रायव्हर गाडीत असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मिहीर शाहनं जुहूतील बारमध्ये मद्यप्राशन केल्यानंतर तो त्याच्या घरी गोरेगावला गेला. लॉन्ग ड्राईव्हसाठी जात असल्याचं सांगत तो मुंबईला आला. तिथून माघारी गोरेगावला जाताना अट्रिक मॉलजवळ हा अपघात झाला. यादरम्यान मिहीर शाह स्वतः गाडी चालवत असल्याचं समजतंय.

logo
marathi.freepressjournal.in