आयडियल व एमपीसीबी मंडळाची दहीहंडी फोडली वरळी पोलीस कॅम्प मंडळाने

जॉली महिला मंडळ पार्ले पथकाने तर अंध व विकलांग गोपाळांनी दहीहंडी फोडली
आयडियल व एमपीसीबी मंडळाची दहीहंडी फोडली वरळी पोलीस कॅम्प मंडळाने

मुंबई : आयडियल व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आयोजक असलेली दादरच्या आयडल गल्लीतील मानाची दहीहंडी वरळी पोलीस कॅम्प मंडळाने फोडली. मानाची महिलांची दहीहंडी सकाळी ८ वाजता जॉली महिला मंडळ पार्ले पथकाने तर अंध व विकलांग गोपाळांनी दहीहंडी फोडली.

सेलिब्रिटी दहीहंडी ही शिरीष राणे निर्मित "दिल दोस्ती दुनियादारी" या आगामी चित्रपटातील कलाकारांनी दहीहंडीचे थर रचत दुर्वा साळोखे या कलाकाराने दहीहंडी फोडण्याचा मान राखला. यात कलाकार विजय पाटकर, तीर्था मुरबाडकर, दुर्वा साळोखे, कमलप्रीत सिंग, दिग्दर्शक शिरीष राणे उपस्थित होते.

कलर्स वाहिनीवरील ढोलकीच्या तालावर या लोकप्रिय कार्यक्रमातील स्पर्धक नम्रता सांगळे, नेहा पाटील, शुभम बोराडे, समता आमणे, तनुजा शिंदे, पूर्वा साळेकर यांनी नृत्य सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली. शुभम बोराडे यांनी गोविंदा पथकांना शुभेच्छा देत त्यांचा उत्साह द्विगुणित केला.

सारेगम लिटिल चॅम्प , आम्ही सारे खवय्ये फेम छोटी निवेदिका स्वरा अभिजित जोशी या बालकलाकार मुलीने गाणे गाऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. क्राईम पेट्रोल, टर्री जाहिरातीतून झळकणारी स्नेहा जोशी, शिट्टी वादन करून दाखविणारा रुपेश मुरुडकर यांनी हजेरी लावली.

विशेष आकर्षण म्हणजे मालाडच्या शिवसागर मित्र मंडळ गोविंदा पथकाने थर रचून महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर सुंदर देखावा सादर केला. स्वतःचे रक्षण स्वतः करा, अन्याय सहन करू नका असा संदेश या देखाव्यातून देण्यात आला. मुंबई पोलिसांच्या कामगिरीला ही सलामी देण्यात आली. ही दहीहंडी साईदत्त मित्र मंडळ आणि बाबूशेट मित्र मंडळ यांच्या सहकार्याने होत असते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in