वरळी सी लिंक ते मरीन ड्राईव्ह १२ मिनिटांत; उत्तर मार्गिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा कोस्टल रोड अखेर मुंबईकर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे.
वरळी सी लिंक ते मरीन ड्राईव्ह १२ मिनिटांत; उत्तर मार्गिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
एक्स
Published on

मुंबई : मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा कोस्टल रोड अखेर मुंबईकर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे सी लिंक दरम्यान १२ मिनिटांत प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी वरळी ते वांद्रे सी लिंक उत्तर मार्गिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला. पर्यावरणपूरक, वेळ व इंधनाची बचत, १४ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या कोस्टल रोड प्रकल्प मुंबईचे भूषण ठरला आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. दरम्यान, उद्या सोमवारपासून मरीन ड्राईव्ह ते वांद्रे सी लिंक प्रवासासाठी खुला झाला असून सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत भूमिगत प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍पातील एका भागाचे सुशोभीकरण सुरू असून ७० हेक्‍टर क्षेत्रावर हरित क्षेत्र विकसित केले जाणार आहे. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस् जंक्शन आदी भागातील प्रवाशांना किनारी रस्ता प्रकल्पावर ये-जा करण्याची सुविधा देणाऱ्या तीन आंतर मार्गिकांचे लोकार्पण यावेळी करण्‍यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्र एकनाथ शिंदे, माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार, कौशल्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुख्‍यमंत्री कार्यालयाच्‍या प्रधान सचिव अश्विनी भिडे, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्‍यासह विविध मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. या रस्त्याचे दुभाजक सुशोभीकरण करण्यात येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

मुंबई किनारी रस्त्याचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून रविवारी उत्तरवाहिनी मार्गाचे उद्घाटन झाले आहे. प्रजासत्ताक दिनी हा मार्ग नागरिकांना समर्पित होत असून उद्या सोमवारपासून या मार्गासह अन्य तीन आंतर मार्गिका खुल्या होतील. मरीन ड्राईव्ह कडून प्रभादेवीकडे जाण्यासाठी आंतर मार्गिका, मरीन ड्राईव्ह कडून बिंदू माधव ठाकरे चौकाकडे जाणारी आंतर मार्गिका तसेच बिंदू माधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतर मार्गिका यांचा समावेश आहे. आता केवळ एक आतंर मार्गिकेची जोडणी व्‍हायची आहे. फेब्रुवारी अखेरीस ही आंतर मार्गिका मुंबईकरांच्या सेवेत येईल सेवेत. कोस्टल रोड प्रकल्‍प विकसित करणा-या बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि त्यांच्या चमूचे, अभियंत्‍यांचे अभिनंदन करतो, असेदेखील मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्‍प अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. किनारी रस्त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तांत्रिक कामामुळे आपण परदेशात आहोत, अशी जाणीव निर्माण होते. नरिमन पॉंईंटकडून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या उत्‍तर वाहिनी पुलाच्‍या आणि इतर तीन आंतरमार्गिकांच्‍या लोकार्पणामुळे राजीव गांधी सागरी सेतू (सी लिंक) ते वरळी मरीन ड्राईव्ह दरम्‍यानचा प्रवास अवघा १० ते १२ मिनिटात होणार आहे.

मुंबईकरांच्या जीवनात मोठा बदल घडविण्‍याचे काम शासनाकडून केले जात आहे. किनारी रस्‍ता प्रकल्‍पाचे कामकाज वेळेत पूर्ण करणारे मुंबई मनपाचे अधिकारी, अभियंते अभिनंदनास पात्र आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

१० महिन्यांत ५० लाख वाहनांची सफर!

कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यांतर्गत शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी १०.५८ किलोमीटर आहे. आजपर्यंत प्रकल्पाची ९४ टक्के बांधणी पूर्ण झाली आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून १२ मार्च २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ५० लाख वाहनांनी ये-जा केली आहे. तसेच या मार्गावरून दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास सुरू असतो.

logo
marathi.freepressjournal.in