सुट्ट्या पैशांची चिंता मिटली!प्रवाशांच्या सेवेत डिजिटल तिकीट प्रणाली ;यूपीआय, क्यूआर कोड सुविधा उपलब्ध

इंटरनेट, मोबाईलच्या युगात कॅशलेस खरेदीची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता ऑनलाईन पेमेंटला लोकांनी पसंती दिली आहे.
सुट्ट्या पैशांची चिंता मिटली!प्रवाशांच्या सेवेत डिजिटल तिकीट प्रणाली ;यूपीआय, क्यूआर कोड सुविधा उपलब्ध
Published on

मुंबई : एसटीतून प्रवास करताना सुट्ट्या पैशांवरून कंडक्टर व प्रवाशांमध्ये होणारे वाद आता संपुष्टात येणार आहेत. एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत ‘डिजिटल प्रणाली’द्वारे तिकीट खरेदीची सुविधा उपलब्ध केली आहे. एसटीच्या वाहकांसाठी ॲँड्रॉईड तिकीट इश्यू मशिन्स नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत. नव्या मशीनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी यूपीआय, क्यूआर कोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकीट काढता येणार आहे.

इंटरनेट, मोबाईलच्या युगात कॅशलेस खरेदीची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता ऑनलाईन पेमेंटला लोकांनी पसंती दिली आहे. एसटी महामंडळानेही एक पाऊल पुढे टाकत डिजिटल तिकीट प्रणाली अंमलात आणली आहे. मे. ईबिक्सकॅश मोबिलिटी सॉफ्टवेअर लिमिटेड यांच्या सहकार्याने रा. प. महामंडळास सर्व वाहकांसाठी नवीन ॲँड्रॉईड आधारित डिजिटल सुविधा असणाऱ्या तिकीट मशिन्स घेण्यात आल्या आहेत. डिजिटल व्यवहाराला चालना देणे, हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. त्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकीट काढण्यासाठी फोनपे, गुगल पे यांसारख्या यूपीआय पेमेंटसाठी वाहकाकडे असलेल्या ॲँड्रॉईड तिकीट मशीनवर असलेल्या क्यूआर कोडद्वारे प्रवाशांना तिकिटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य आहे. प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत म्हणून एसटीने प्रवास करणे टाळणे, तसेच सुट्या पैशासाठी वाहकासोबत होणारा विनाकारण वाद, असे प्रश्न कायमचे मिटू शकतात.

यूपीआय पेमेंटद्वारे क्यूआर कोडच्या माध्यमातून एसटीच्या सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये तिकीट विक्री सुरू केली असून जास्तीत जास्त प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in