पावसाळी आजारांची चिंता! ८२ हजारांहून अधिक जणांचे रक्ताचे नमुने घेतले एडिस, अँनोफिलीस डासांची १२ हजार उत्पत्तीस्थाने

१५ दिवसांत ७ हजारांहून अधिक लेप्टोचे रुग्ण
पावसाळी आजारांची चिंता! ८२ हजारांहून अधिक जणांचे रक्ताचे नमुने घेतले एडिस, अँनोफिलीस डासांची १२ हजार उत्पत्तीस्थाने

मुंबई : पावसाने उसंती घेतली असली तरी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लू, गॅस्ट्रो आदी आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मलेरियाचा फैलाव होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अँनोफिलीस डासांच्या १,५७८ उत्पत्तीस्थाने व डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत एडिस डासांची १० हजार ६५९ उत्पत्ती स्थाने आढळून आली आहेत. अँनोफिलीस व एडिस डासांच्या उत्पत्ती स्थाने आढळण्याची संख्या चिंतेत भर पाडणारी असल्याने १ ते १५ ऑगस्टपर्यंत ८२ हजार ६९८ लोकांचे रक्ताचे नमुने गोळा करत ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. १ ते १५ ऑगस्टदरम्यान ७ हजार १६९ रुग्णांमध्ये लेप्टोचे निदान झाले आहे. त्यामुळे पावसाची विश्रांती असली तरी साथीच्या आजारांचा फैलाव होत असल्याने पावसाळी आजारांनी चिंता वाढवली आहे.

पावसाने पाठ फिरवल्याने जून कोरडा गेला असला तरी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. ऑगस्टच्या १५ दिवसांत स्वाईन फ्लूचे ९०, मलेरियाचे ४६२, लेप्टोचे १५१, डेंग्यूचे ३१७, गॅस्ट्रोचे ४२९, कावीळचे १५ आणि चिकनगुनियाचे ११ रुग्ण आढळले आहेत. पावसाळी आजार वाढत असल्यामुळे पालिकेकडून प्रमुख रुग्णालयासह उपनगरीय रुग्णालयांत तीन हजार बेड तैनात ठेवले आहेत. तर पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

मलेरिया रोखण्यासाठी झाडाझडती

मलेरिया टाळण्यासाठी अ‍ॅनोफिलीस डासाची उत्पत्तीस्थाने शोधून नष्ट करण्यासाठी १३,२२० घरांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३५,४३५ प्रजनन स्रोतांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १५७८ ठिकाणी मलेरिया डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आली.

डेंग्यू नियंत्रणासाठी शोध मोहीम

डेंग्यूला आळा घालण्यासाठी एडिस डासांचा शोध घेण्यासाठी ७ लाख ४१ हजार ५१९ घरांची तपासणी करण्यात आली. यात ७ लाख ९१ हजार ७५० कंटेनरची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १० हजार ६५९ ठिकाणी एडिस डासाची ठिकाणे आढळली.

१५ दिवसांत ५ हजार उंदरांचा खात्मा!

लेप्टोच्या प्रसारास उंदीर कारणीभूत ठरत असल्यामुळे खासगी संस्था आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मूषक नियंत्रण मोहीम राबवण्यात येत आहे. १ ते १५ ऑगस्टदरम्यान राबवलेल्या विशेष मोहिमेत ४,८६१ उंदरांचा खात्मा करण्यात आला आहे. यात विषारी गोळ्या टाकून २,८४५ तर पिंजरे लावून २०१६ उंदरांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.

खबरदारी घ्या!

गॅस्ट्रो, कावीळ व टायफाईड या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या किटकनाशक विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु मुंबईकरांनीही योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. पाणी उकळून प्यावे, पाणी जास्तीत जास्त प्यावे, रस्त्यांवरील उघडे खाद्यपदार्थ खाणे टाळा.

स्वाईन फ्लूचा धोका टाळा!

मास्कचा वापर करा, गर्दीची ठिकाणे टाळा, शिंकताना किंवा खोकताना रुमालाचा योग्य वापर करावा, वारंवार साबणाने हात धुवणे, डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा.

डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी ही काळजी घ्या!

डोळ्यांचा विषाणू संसर्ग हा मुख्यत्वे अॅडिनो वायरमुळे होतो. लक्षणांमध्ये खाज सुटणे, डोळे लाल होणे, पापण्या सुजणे आणि संसर्ग झालेल्या डोळ्यांतून पांढरा स्त्राव येणे, यांचा समावेश होतो. ज्या व्यक्तींमध्ये डोळ्यांच्या संसर्ग आजाराची लक्षणे आढळतात, त्या व्यक्तींनी आपला जनसंपर्क कमी करावा, तसेच डोळ्याला हात लावू नये व नियमित हात धुवावे, डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घ्या, संक्रमित व्यक्तींचे इतर कपडे, बाथ टॉवेल आणि चादरी स्वतंत्रपणे आणि नियमितपणे धुवावेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in