यारी रोड जंक्शन-लोखंडवाला प्रवास पाच मिनिटांत ;पुलाचा खर्च मात्र १६ कोटींवरून ४२ कोटींवर

या पार्श्वभूमीवर पुलाच्या बांधकाम रचनेत आवश्यक बदल केल्यामुळे आता पुलाचा मार्ग मोकळा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यारी रोड जंक्शन-लोखंडवाला प्रवास पाच मिनिटांत ;पुलाचा खर्च मात्र १६ कोटींवरून ४२ कोटींवर

मुंबई : गेल्या २० वर्षांपासून रखडलेल्या अंधेरी यारी रोड ते लोखंडवाला कॉम्प्लेक्स दरम्यानचा पूल लवकरच सेवेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे अंधेरी यारी रोड ते लोखंडवाला पुलावरून ४५ मिनिटांचा प्रवास फक्त पाच मिनिटांत करणे शक्य होणार आहे. मात्र पुलाच्या कामाचा खर्च १६ कोटींवरून ४२ कोटींवर पोहोचला आहे.

मुंबईतील वाहतूककोंडीवर उपाय म्हणून उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. अंधेरी यारी रोड ते लोखंडवाला या दरम्यानच्या पुलाचा प्रकल्प २००२ पासून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. २०१२ मध्ये या प्रकल्पासाठी निविदाही काढण्यात आली होती. लोखंडवाला यारी रोडपासून खाडीने वेगळे केले आहे आणि या दोन ठिकाणांमध्ये थेट संपर्क नसल्याने वाहनचालकांना चार आणि सात बंगल्यांतून वळसा घालून जावे लागते. यासाठी रहदारीच्या वेळी तब्बल ३० ते ४५ मिनिटांचा वेळ लागतो. मात्र आता नव्या पुलामुळे हे अंतर अवघ्या पाच मिनिटांत कापले जाणार असल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकल्पामुळे खारफुटीवर परिणाम होणार असल्याचे सांगत न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे हा पूल रखडला होता. या पार्श्वभूमीवर पुलाच्या बांधकाम रचनेत आवश्यक बदल केल्यामुळे आता पुलाचा मार्ग मोकळा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

असा असेल पूल!

पूल बांधण्यात येणारी खाडी सुमारे १०० मीटर रूंद आहे आणि पुलाचा प्रस्तावित रोड सुमारे १६० मीटरचा राहणार आहे.

हा पूल खाडीच्या दोन टोकांना जोडणारा असेल. या प्रकल्पात वाहतुकीसाठी दोन कॉजवे असतील.

कंत्राटदार नियुक्त केल्यानंतर राज्य सरकारकडून पर्यावरण मंजुरीसाठी नव्याने परवानगी मागितली जाईल.

या पुलामुळे सध्या होणारी वाहतूककोंडी फुटण्यास मदत होणार असून वेळ, इंधन वाचणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in