
शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आल्यानंतर आता ईडीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागण्याची शक्यता आहे. यशवंत जाधव यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी आयकर विभागाकडून यशवंत जाधव यांचे घर, मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीकडून समन्स आल्याने यशवंत जाधव अडचणीत येण्याची शक्यता आहे.
यशवंत जाधव यांना ‘फेमा’अंतर्गत ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. ईडीकडून आता यशवंत जाधवांच्या परदेशातील गुंतवणुकींची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जाधव यांची संपत्ती
३६ वरुन ५३ वर पोहोचली
यशवंत जाधव यांच्या संपत्तीची आणखी एक माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. आयकर विभागाने केलेल्या चौकशीतून यशवंत जाधव यांची संपत्ती आता ३६ वरून ५३ वर पोहोचली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत जाधव प्रकरणात आयकर खात्याच्या चौकशीत आणखी काही बाबी उघड झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांत तपासाला वेग आला आहे. यशवंत जाधव यांच्या एकूण संपत्तींची संख्या आता ५३ झाली आहे. यात कैसर बिल्डींगचा समावेश आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी म्हणून ही खरेदी करण्यात आली असून या एका इमारतीतून ८० कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांत आयकर खात्याने या ठिकाणी जाऊन तपासणी आणि खातरजमा केली.