होय आम्ही निष्ठावान आहोत,’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास असणारे शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवाजी पार्कमध्ये एकवटले होते. “आमच्या नेत्यासोबत विश्वासघात झाला आहे. परंतु आम्ही पैसे किंवा सत्तेसाठी पक्षात आलेलो नाही. त्यामुळे आम्ही आमच्या नेत्याला सोडणार नाही, असे गेल्या दोन-तीन दशकांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले ज्येष्ठ शिवसैनिक सांगत होते.
कोल्हापूर येथील शेतकरी बळवंत कवडे (वय ७२ वर्षे) हे पहाटेच शिवाजी पार्कमध्ये पोहोचले होते. “आम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी शिवसेनेत होता, म्हणून आम्ही त्यांना मतदान केले. त्यांनी शिंदे गटात जाऊन आमचा आणि सर्वांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी येथे आलो आहोत. आम्ही रात्री इथेच कुठेतरी स्टेशनवर झोपू आणि उद्या सकाळी आमच्या गावाला निघू,” असे कवडे म्हणाले.
कुलाब्यातील शिवसेनेचा मुस्लिम कार्यकर्ता (उपशाखा प्रमुख) शकील खुरेशी हे शिवाजी पार्कमध्ये चालत आले. “गेल्या १० वर्षांपासून मी दसरा मेळाव्याला हजेरी लावत आहे. बंडखोरांना आम्ही कदापि माफ करणार नाही. पक्षाने त्यांना सत्ता दिली, पद दिले. त्यांनी बंडखोरी केली. मतदार त्यांना त्यांची जागा दाखवतील,” अशी प्रतिक्रिया खुरेशी यांनी दिली.
कर्जत येथील तुकाराम फोफे (वय ७०) म्हणाले की, “शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर माझा नेहमीच विश्वास आहे. मला राजकारण समजत नाही, मी इथे सत्तेसाठी किंवा पैशासाठी नाही. उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी दरवर्षी येतो.
अविनाश माने (उपशाखाप्रमुख, मालाड) म्हणाले, “गेल्या २० वर्षांपासून आमच्या भागातील कार्यकर्त्यांसोबत मी दसरा मेळाव्यात सहभागी होतो. कठीण परिस्थितीत पक्षाला आमची सर्वात जास्त गरज असताना आम्ही साथ सोडणार नाही. आज पक्ष सत्तेत नाही. पण आमच्यासारखे निष्ठावंत त्यांच्यासोबत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवू.”
भांडुपचे शिवसेना आमदार रमेश कोरगावकर म्हणाले, “मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षात काम केले, पक्षनेतृत्वाने माझ्यावर विश्वास ठेवून मला शाखाप्रमुख केले. चार वेळा नगरसेवक म्हणून संधी दिली आणि आता मी आमदार आहे. आता पक्षाला माझी गरज आहे, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहणे, हे माझे कर्तव्य आहे. असा विश्वासघात शिवसेनेसाठी नवीन नाही, आम्ही पक्षबांधणीसाठी ताकदीने उतरू,” असा विश्वास कोरगावकर यांनी व्यक्त केला.
गोरेगाव येथील मंदा रेडकर या ५० वर्षीय महिला शिवसैनिक मोठ्या हिरारीने दसरा मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. “आधी बाळासाहेब ठाकरे आणि आता उद्धव ठाकरे यांना ऐकायला गेल्या १५ वर्षांपासून मी शिवाजी पार्कला मेळाव्याला येते. माझ्या अडचणीत काळात शिवसेना माझ्या पाठीशी उभी राहिली. आता पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याची माझी पाळी आहे,” असे त्यांनी सांगितले.