
मुंबई : अभिनेत्रीशी अश्लील संभाषण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी अक्षय ऊर्फ आकाश राजवीर भुंबक या २९ वर्षीय आरोपी ओशिवरा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने जामिन मंजूर केला आहे. जोगेश्वरी येथे राहणारी तक्रारदार तरुणी ही ऍक्टर असून, ती बॉलीवूडमध्ये करिअर करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या व्हॉटस्अॅपग्रुपवरून तिची आकाशसोबत ओळख झाली होती. या ओळखीनंतर तो तिला सतत फोन करत होता. तिला बॉलीवूड शो तसेच चित्रपटात काम देण्याचे आश्वासन देत होता. काही दिवसांपूर्वी त्याने तिला एक बॉलीवूड शोमध्ये काम देतो असे सांगून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली होती. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर तिने त्याच्याशी बोलणे टाळले होते. त्यानंतर अलीकडेच त्याने तिला पुन्हा फोन करून एका निर्मात्याची माहिती देताना त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. तिने तसे केल्यास तिला त्याच्या चित्रपटात चांगले काम मिळेल, असे सांगून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता.