
मुंबई : बोगस व्हिसावर लंडनला जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गौतमकुमार करशनभाई इटालिया या तरुणाला सहार पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करून फसवणुक केल्याचा आरोप असून याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी साडेचार वाजता गौतमकुमार हा लंडनला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता.
यावेळी त्याच्याकडील कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर तिथे उपस्थित इमिग्रेशन अधिकाऱ्यांना त्याने सादर केलेला स्टुडंट व्हिसा, शैक्षणिक सर्टिफिकेटबाबत शंका निर्माण झाली. त्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने मध्य प्रदेशच्या एका नामांकित कॉलेजचे बोगस शैक्षणिक सर्टिफिकेटच्या मदतीने लंडनचा स्टुडंट व्हिसा मिळविल्याचे तपासात उघडकीस आले. त्याने बोगस व्हिसा मिळवून लंडनला जाण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्याला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.