मुंबई : विमान प्रवासादरम्यान धूम्रपान करण्यास मनाई असतानाही विमानाच्या टॉयलेटमध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील एका २४ वर्षांच्या तरुणाला सहार पोलिसांनी अटक केली. सावेज लियाकत अली असे या तरुणाचे नाव असून सौदी अरेबिया-मुंबई विमान प्रवासादरम्यान विमानात धूम्रपान करणे त्याला चांगलेच महागात पडले. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. रविवारी रात्री सौदीवरून इंडिगोचे विमान मुंबईसाठी निघाले असताना, त्याने विमानाच्या टॉयलेटमध्ये जाऊन धूम्रपान केले होते. त्याच्याकडून पोलिसांनी सिगारेटचे १० पॅकेट ताब्यात घेतले होते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान लॅड होताच त्याला सुरक्षारक्षकाच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर त्याला सहार पोलिसांकडे सोपविण्यात आले होते.