व्हेल माशाच्या उलटीसह तरुणाला केली अटक

अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
व्हेल माशाच्या उलटीसह तरुणाला केली अटक
Published on

सुमारे अडीच कोटी रुपयांच्या व्हेल माशाच्या उलटीसह एका तरुणाला मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली. वैभव जनार्दन कालेकर असे या २५ वर्षांच्या तरुणाचे नाव असून, त्याच्याकडून पोलिसांनी दोन किलो ६१६ ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मरिन ड्राइव्ह परिसरात काही जण बंदी घातलेल्या व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांच्या पथकाने मरिन ड्राइव्ह सी फेसजवळील ओबेरॉय हॉटेलसमोर साध्या वेशात पाळत ठेवली होती. मंगळवारी दुपारी १२.३० वाजता तिथे वैभव आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडील सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकाऱ्यांना दोन किलो ६१६ ग्रॅमची उलटी सापडली.

logo
marathi.freepressjournal.in