
मुंबई : धारावी येथे एका २४ वर्षांच्या तरुणावर चौघांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केला. स्टेनी शांतकुमार दोडमनी असे या तरुणाचे नाव असून, त्याच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या चारही आरोपीविरुद्ध धारावी पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
स्टेनी हा धारावी येथे राहत असून, चालक म्हणून काम करतो. शोएब, त्याचा भाऊ आणि इतर दोन तरुण याच परिसरात राहत असून, ते एकमेकांच्या परिचित आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्याचा शोएबसह इतर तिघांच्या मनात राग होता. गुरुवारी सकाळी नऊ स्टेनी हा त्याच्या मित्रासोबत राजीव गांधी स्पोर्ट्स क्लबसमोर गप्पा मारत होते. यावेळी तिथे शोएब, त्याचा भाऊ व त्याचे दोन मित्र आले. या चौघांनी पूर्वी झालेल्या वादातून स्टेनीवर तलवारीने वार केले. त्यात त्याच्या कानाला, गालाला आणि दोन्ही हाताला गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर ते चौघेही पळून गेले. स्टेनीला त्याच्या मित्रासह इतर स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या शीव रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला आंतरुग्ण म्हणून दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही माहिती मिळताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी स्टेनीची जबानी नोंदवून पोलिसांनी चारही मारेकऱ्यांविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.