
बलात्कार झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या प्रेयसीला न्याय मिळावा यासाठी मंत्रालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या प्रियकराने आज मंत्रालयात पाचव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मागील तीन वर्षांपासून तिला न्याय मिळावा यासाठी प्रियकराचे प्रयत्न सुरू होते. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलले. बापू नारायण मोकाशी (४३ वर्षे) असे या तरुणाचे नाव असून तो बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पारगाव जोगेश्वरी गावातील रहिवासी आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बापू मोकाशी यांनी पाचव्या मजल्यावरून उडी मारली. मात्र, मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीवर पडला. त्यामुळे त्याला फारशी दुखापत झालेली नाही. पोलिसांनी या प्रकरणी त्याला ताब्यात घेतले असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मागील काही दिवसातील ही दुसरी घटना आहे. आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. त्यानिमित्ताने मंत्रालयात मोठी गर्दी उसळली होती. त्यातच अचानकपणे बापू मोकाशी यांनी आपल्या मागण्यांवर कार्यवाही होत नसल्याने उडी मारली. या तरुणाने उडी मारल्यानंतर मंत्रालयात एकच खळबळ उडाली.