
मुंबई : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने एका तरुणाची फसवणूक झाल्याचा प्रकार भांडुप परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिद्धेश परब आणि प्रविण कांबळे या दोघांविरुद्ध भांडुप पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही तरुणांची फसवणूक केली आहे का, याचा आता पोलीस तपास करत आहेत. भांडुप येथे राहणारा मयुर भरत कांबळे हा चालक म्हणून काम करत असून, पाच वर्षांपूर्वी तो नोकरीच्या शोधात असताना त्याची सिद्धेशशी ओळख झाली होती. त्याने त्याची काही रेल्वे अधिकाऱ्यांशी चांगली ओळख असून, त्याला रेल्वेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांच्याच घरी त्याच्याकडून रेल्वेत नोकरीसाठी फॉर्म भरुन घेण्यात आला होता. तसेच नोकरीसाठी त्याच्याकडून टप्याटप्याने पाच लाख सतरा हजार रुपये घेतले होते. दोन वर्ष उलटूनही त्याने त्याला रेल्वेमध्ये नोकरी दिली नाही. त्यामुळे त्याने त्याच्या पैशांची मागणी सुरू केली होती. तसेच पैशांची मागणी केल्यानंतर सिद्धेशने त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर त्याने भांडुप पोलिसांत तक्रार केली होती.