
मुंबई : लोकल ट्रेनमधून पडून मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या पालकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाल यांनी तरूणाच्या पालकांना ४ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश देताना रेल्वे दावा न्यायाधिकरणाचा निर्णय रद्द केला. न्यायाधिकरणाने रेल्वे अधिकाऱ्यांना तात्काळ तक्रार न करणे तसेच रेल्वे तिकीट नसल्याच्या कारणावरून भरपाई नाकारली होती.
वडाळा ते चिंचपोकळी असा मासिक पास असलेला नासिर अहमद खान हा तरुण कामावर जात असताना गर्दीमुळे लोकल ट्रेनमधून खाली पडला. त्यात तो बेशुद्ध झाला होता. त्याला जे .जे , रुग्णालयात नेण्यात आले होते आणि तिथे त्याला आपत्कालीन कक्षात दाखल केले. दुर्दैवाने त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता त्याचा मृत्यू झाला होता.
मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या पालकांनी भरपाई मागत रेल्वे दावा न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती. तथापि, न्यायाधिकरणाने खान हा वैध प्रवासी होता की नाही, यावरच शंका उपस्थित केली होती. तसेच अपघाताबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांना तात्काळ तक्रार न करणे आणि रेल्वे तिकीट नसणे यावरून भरपाई मंजूर करण्यास नकार देत खानच्या पालकांचा दावा फेटाळून लावला.
या निर्णया विरोधात खानच्या पालकांनी याचिका दाखल केली. न्यायालयाने खानच्या पालकांना ४ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.