
मुंबई : अपघातात जखमी झालेल्या कुणाल विजय वाळुंज या १९ वर्षांच्या तरुणाचा जे. जे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात त्याचा मामेभाऊ भूषण मोरे हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु होते. फ्रीवेवर बाईक चालविण्यास मनाई असताना भरवेगात बाईक चालविणे कुणालच्या जिवावर बेतल्याचे पोलिसांनी सांगितले. १४ जुलैला मध्यरात्री शिवडी पोलिसांचे एक विशेष परिसरात गस्त घालत होते. पहाटे चार वाजता मुख्य नियंत्रण कक्षातून माझगाव येथील ईस्टर्न फ्रीवेवरील ऑरेज गेटजवळ एक अपघात झाला असून उपचारासाठी पोलिसांची मदत हवी आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना १९ वयोगटातील दोन तरुणांचा अपघात झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या दोघांनाही पोलिसांनी जे. जे रुग्णालयात दाखल केले. या दोघांची दुखापत गंभीर असल्याने त्यांना आंतरुग्ण म्हणून दाखल करण्यात आले होते. तिथे एका तरुणाला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. उपचारादरम्यान शुक्रवारी २१ जुलैला रात्री साडेदहा वाजता कुणाल वाळुंज या तरुणाचा मृत्यू झाला. चौकशीअंती मृत कुणाल हा त्याचा मामेभाऊ भूषण मोरेसोबत बाईकवरुन जात होता. फ्रीवेवर बाईक चालविणे मनाई आहे. असे असताना कुणालने नियमांचे उल्लघंन करुन भरवेगात बाईक चालविण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटले होते. बाईक स्लीप होऊन ते दोघेही जखमी झाले होते. उपचारादरम्यान अखेर कुणालचा मृत्यू झाला होात. याप्रकरणी भूषण मोरेची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतच्या मृत्यूस तर मामेभावाला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी कुणाल वाळुंजविरुद्ध शिवडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता.