वांद्रे-वरळी सी लिंक वरुन तरुणाची समुद्रात उडी ; शोधकार्य सुरु

नौदल आणि तटरक्षक दलाच्या मदतीने मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाकडून या तरुणाचा शोध घेण्याचं काम सुरु आहे.
वांद्रे-वरळी सी लिंक वरुन तरुणाची समुद्रात उडी ; शोधकार्य सुरु

मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरुन गुरुवारी पहाटे एका ३३ वर्षीय व्यक्तीने अरबी समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या तरुणाचा शोध घेतला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. नौदल आणि तटरक्षक दलाच्या मदतीने मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाकडून या तरुणाचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. या तरुणाने पहाटे चार वाजेच्या सुमारास समुद्रात उडी घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

विनय यादव असं समुद्रात उडी घेतलेल्या तरुणाचं नाव असून तो मुंबईतील पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी येथील रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. विनय हा व्यवसायाने ड्रायव्हर असून तो इन्होव्हा कारमधून आला, त्याने पुलावर कार उभी केली आणि समुद्रात उडी घेतली. स्थानिक पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर या तरुणाचा शोध घेण्याचं काम सुरु असून समुद्रात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या तरुणाने समुद्रात उडी का मारली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, वांद्रे-वरळी सी लिंकवरुन समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना सध्या वाढताना दिसत आहेत. ३१ जुलै रोजी एका व्यक्तीने अशाच प्रकारे या सी लिंकवरुन उडी घेतली होती. दुसऱ्या दिवशी या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता.

logo
marathi.freepressjournal.in