
धर्मेश ठक्कर / मुंबई
स्पॅनिश लक्झरी फॅशन ब्रँड झाराने मुंबईतील आपले प्रमुख फ्लॅगशिप स्टोअर सोमवारी बंद केले. दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठित ११० वर्षे जुन्या इस्माईल बिल्डिंगमध्ये असलेले हे स्टोअर अखेर बंद करण्यात आले. हेरिटेज दर्जा असलेल्या या ५१,३०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या इमारतीत झाराचे मोठे स्टोअर होते. मुंबईच्या वर्दळीच्या व्यावसायिक भागात ते स्थित होते.
दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील या प्रसिद्ध स्टोअरने सोमवारी सकाळी आपले दरवाजे कायमस्वरूपी बंद केले. मे २०१७ मध्ये सुरू झालेले हे झाराचे स्वतंत्र स्टोअर, फ्लोरा फाउंटन येथे पाच मजल्यांमध्ये विस्तारले होते आणि मुंबईतील फॅशनप्रेमी आणि उच्चभ्रू खरेदीदारांचे आवडते ठिकाण बनले होते.
भारतामध्ये झाराची स्टोअर्स इंडीटेक्स ट्रेंटद्वारे चालवली जातात. ही कंपनी स्पेनच्या इंडीटेक्स आणि टाटा समूहाच्या ट्रेंट लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम आहे. या स्टोअरच्या भाड्यासाठी कंपनीने इस्माईल बिल्डिंगच्या मालक सुपारीवाला एक्स्पोर्ट्सला वार्षिक ₹३० कोटी भाडे दिले होते. हा करार १५ वर्षांसाठी होता, ज्यामध्ये ५ वर्षे लॉक-इन कालावधी होता.
झारा बंद झाल्याची माहिती नसल्याने अनेक ग्राहक फ्लोरा फाउंटन येथे स्टोअरमध्ये खरेदीसाठी आले होते. मात्र, स्टोअर बंद झाल्याचे पाहून त्यांचा भ्रमनिरास झाला. "मी माझ्या चुलत बहिणींसोबत मालाडहून झारामध्ये डेस्टिनेशन वेडिंग पार्टीसाठी कपडे खरेदी करण्यासाठी आले होते. आता लोअर परळच्या स्टोअरमध्ये जावे लागेल," असे २७ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट अमीषा शाह यांनी सांगितले.
दुपारनंतर स्टोअरने एका फलकावर घोषणा केली – "कृपया लक्षात घ्या की हा झारा स्टोअर २३ फेब्रुवारीच्या व्यवसायाच्या समाप्तीनंतर कार्यरत राहणार नाही."
जागतिक पुनर्रचना आणि उत्पादन साखळीवरील परिणाम
गेल्या वर्षी, झाराच्या पालक कंपनी इंडीटेक्सने जागतिक पातळीवर मोठ्या पुनर्रचना योजनांची घोषणा केली होती, ज्यामुळे १,२०० स्टोअर्स बंद करण्यात आली. कंपनी डिजिटल माध्यमांवर अधिक लक्ष केंद्रीत करत आहे.
याशिवाय, बांगलादेशमधील वस्त्र उत्पादन कारखाने बंद केल्याने जागतिक फॅशन ब्रँड्सवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक पारंपरिक स्टोअर्स अजूनही कोविड-१९ महामारीनंतरच्या प्रभावांमधून सावरू शकलेले नाहीत. ग्राहकांच्या खरेदीसंबंधी सवयी बदलत आहेत, ऑनलाईन प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढत आहे, आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय, विशेषतः बांगलादेशमधील उत्पादन युनिट्सच्या बंदीमुळे, मोठ्या कंपन्यांना आपल्या व्यवसायधोरणात बदल करावा लागत आहे.
इंडीटेक्सचे बांगलादेशमध्ये मोठे उत्पादन केंद्र होते. तिथे १५० पुरवठादार आणि २७३ शिवणकाम कारखाने कार्यरत होते. जवळपास १० लाख कामगार या कारखान्यांमध्ये कार्यरत होते.
ई-कॉमर्समुळे ग्राहक व्यवहार बदलले
टाटा ट्रेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्टोअर बंद करण्याबाबत भाष्य करण्यास टाळले, मात्र त्यांनी मान्य केले की, कमी होत असलेली ग्राहकांची गर्दी आणि ई-कॉमर्सच्या वाढत्या प्रभावामुळे झाराने ग्राहकांशी जोडणी साधण्याच्या धोरणाचा पुनर्विचार केला आहे. "आता ग्राहकांना वैयक्तिकृत खरेदीचा अनुभव देण्यासाठी डेटा-आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. आभासी ट्राय-ऑनसाठी ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शिफारसी देण्यावर कंपनी भर देणार आहे," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.