विजापूर : छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलासमवेत झालेल्या चकमकीत बुधवारी एक नक्षलवादी ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी घडविण्यात आलेल्या आयईडीच्या स्फोटात दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.
जिल्हा राखीव दलाच्या पथकाने गंगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंगा गावातील जंगलात नक्षलविरोधी मोहीम हाती घेतली होती, तेव्हा ही चकमक उडाली. या परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहीम हाती घेण्यात आली होती. गस्ती पथक परिसराला वेढा घालत असताना चकमक उडाली.चकमक थांबल्यानंतर घटनास्थळी एका नक्षलवाद्याचा मृतदेह मिळाला. तसेच तेथून एक पिस्तूल, एक आयईडी, सहा रिमोट स्विच आणि माओवादी साहित्यही जप्त करण्यात आले. नक्षलवाद्यांनी घडविलेल्या स्फोटात दोन रक्षक किरकोळ जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.