

इम्फाळ : भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्यानंतरही भारताकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) देशाच्या सुरक्षेसाठी १० उपग्रह २४ तास अवकाशातून सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी सक्रिय असल्याची माहिती ‘इस्त्रो’चे चेअरमन व्ही. नारायणन यांनी दिली.
‘एग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी’च्या एका कार्यक्रमात इम्फाळमध्ये ते बोलत होते. पाकिस्तानशी सुरू असलेल्या तणावादरम्यान देशाच्या सुरक्षेसाठी ‘इस्त्रो’ वैज्ञानिक सातत्याने प्रयत्नशील होते. यापुढेही भारत-पाकिस्तान सीमेवर नवीन उपग्रहाद्वारे कायम करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
‘रिसॅट-१बी’ करणार लॉन्च
येत्या १८ मे रोजी ‘इस्त्रो’ नवीन सॅटेलाईट लॉन्च करणार आहे. त्याचे नाव ‘रिसॅट-१बी’ असे आहे. त्याला ‘ईओएस-०९’ नावानेही ओळखले जाणार आहे. श्रीहरिकोटा येथून स्पेस सेंटरहून ते लॉन्च होईल, असे इस्रोच्या अध्यक्षांनी सांगितले रिसॅट-१बी ही एक खास रडार इमेजिंग सॅटेलाईट आहे, जी प्रत्येक वातावरणात काम करू शकते. पाऊस, धुके, रात्र असतानाही या सॅटेलाईटमधून पृथ्वीवरचे फोटो घेता येऊ शकतात. त्यात सी-ब्रँड सिंथेटिक एपर्चर रडार लावण्यात आली आहे. ही रडार खूप चांगल्या क्वालिटीचे फोटो घेते. नेहमी जे कॅमेरेवाले सॅटेलाईट असतात ते खराब हवामानात अथवा रात्री चांगले फोटो घेत नाहीत, परंतु ‘रिसॅट-१बी’ प्रत्येक परिस्थितीत काम करते.
सागरी किनाऱ्यांवरही लक्ष
देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कमीत कमी १० उपग्रह सातत्याने काम करत आहेत. जर आपल्याला देशाच्या सुरक्षेची काळजी घ्यायची असेल तर सॅटेलाईटच्या माध्यमातून आपल्याला सेवा करावी लागणार आहे. आम्ही आपल्या ७,००० किमी सागरी किनाऱ्यावर लक्ष ठेवून आहोत. उत्तरेकडेही सातत्याने लक्ष दिले जात आहे.
हालचाली सहज दिसणार
दरम्यान, ‘रिसॅट-१बी’ दहशतवाद्यांना पकडण्यास मदत करेल. जर दहशतवादी सीमेतून घुसखोरी करत असतील तर त्यांच्या हालचाली सहजपणे टिपेल. या सॅटेलाईटमध्ये ५ वेगवेगळ्या इमेजिंग मोड आहेत. एक मोडमध्ये खूप लहान गोष्टीचाही फोटो घेता येऊ शकतो. दुसऱ्या मोडमध्ये मोठ्या परिसराचा फोटो घेता येईल. या सॅटेलाईटचा मिलिट्रीसोबतच सर्वसामान्यांसाठीही उपयोग होईल. ज्यात शेती, जंगल, माती परीक्षण, भूविज्ञान, पूर यावरही नजर ठेवता येणार आहे.