
नवी दिल्ली : वक्फ सुधारणा विधेयक ‘जेपीसी’ अर्थात संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले असून शुक्रवारी समितीच्या झालेल्या बैठकीत प्रचंड गोंधळ झाला. त्यानंतर शिवसेना खासदार (उबाठा) अरविंद सावंत आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांच्यासह विरोधी बाकावरील १० खासदारांना निलंबित करण्यात आले.
वक्फ समितीच्या गेल्या काही महिन्यांपासून बैठका सुरू आहेत. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर शुक्रवारी संयुक्त संसदीय समितीची बैठक झाली. सुधारणा विधेयकाच्या मसुद्याचा अभ्यास करण्यासाठी विरोधी खासदारांना पुरेसा वेळ दिला जात नाही, या मुद्द्यावरून वाद सुरू झाला. भाजपचे खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत काश्मीरचे मीरवाईज उमर फारुकी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले जाणार होते. पण, त्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या खासदारांनी आक्षेप घेतला.
विरोधी पक्षाच्या खासदारांनी आरोप केला की, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वक्फ सुधारणा विधेयकावरील अहवाल तातडीने मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये यावरून वादविवाद सुरू झाला. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी, काँग्रेसचे सय्यद नासिर हुसैन हे बैठकीवर बहिष्कार टाकत निघून गेले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर अध्यक्षांनी दहा खासदारांना एका दिवसासाठी निलंबित केले.
या बैठकीत अहवालावर चर्चा होऊन ते विधि मंत्रालयाकडे दिले जाणार होते. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सदर विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. भाजपचे खासदार जगदंबिका पाल हे या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले की, आज आम्ही जम्मू-काश्मीरमधील शिष्टमंडळ मीरवाईज उमर फारुक यांच्या शिष्टमंडळाला त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वेळ दिला होता. मात्र, संसदेत विधेयकाच्या चर्चेत सहभागी न होणारे असदुद्दीन ओवैसी आज मात्र चर्चेत सहभागी झाले. तसेच तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी माझ्याशी असभ्य वर्तन करत असंसदीय भाषा वापरली. मी त्यांना शांत करण्याचे आवाहन करत होतो. पण ते ऐकायला तयार नव्हते. अखेर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी खासदारांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव दिला.
या खासदारांना केले निलंबित
कल्याण बॅनर्जी, मोहम्मद जावेद, ए. राजा, असदुद्दीन ओवैसी, नासिर हुसैन, मोहीबुल्लाह, मोहम्मद अब्दुला, अरविंद सावंत, नदीम उल हक आणि इमरान मसूद यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले.